संजय मोहिते
बुलढाणा तब्बल तिनेक महिन्यानंतर जिल्ह्याला ‘पालक’ मिळाला असून ८ महिन्यांच्या खंडानंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा मुहूर्त सापडेल, अशी चिन्हे आहे. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास असणारे व रोखठोक नेते, अशी ओळख असणारे ना. गुलाबराव पाटील यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धूर्त खेळी खेळल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याशिवाय भविष्यात एकाच बाणाने अनेक शिकार करण्याचे छुपे हेतू यामागे आहे.
हेही वाचा >>> गडचिरोलीमधील सूरजागड येथे प्रस्तावित वाढीव उत्खननामुळे १३ गावांवर विस्थापनाचे संकट
बुलढाणा आणि लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक, व्यापारी आणि राजकीय संबंध आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सासुरवाडी नांदुरा खुर्द ही आहे. त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेरच्या खासदार. मलकापूर विधानसभा मतदारसंघ जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे. एकसंघ शिवसेनेची बुलंद तोफ, अशी ओळख असलेले ना. पाटील यांच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारसभा ठरलेल्या. बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यासह सैनिकांशीही जवळीक असलेल्या या नेत्याला आता शिवसेनेशीच दोन हात करण्याची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचे कारण खासदार प्रतापराव जाधव, आमदारद्वय संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर हे नेते शिंदे गटात सामील झाले. पण बहुतेक पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील नेते व सैनिकांची फौज उद्धव ठाकरेंसोबतच राहिली. ज्येष्ठ व तरुण नेत्यांचा समावेश असलेल्या ठाकरे शिवसेनेने या नेत्यांसमोर कडवे आव्हान उभे करीत पक्षाची पडझड होऊ दिली नाही. ठिकठिकाणी पार पडलेल्या मेळाव्यांना जंगी प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा >>> आंदोलनातून हुकूमशहा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे – वरिष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांचे मत
प्रतिकार तीव्र होणार
शिवसेनेला तूर्त तरी आमदार गायकवाड हे उघड प्रतिकार करीत आहेत. अन्य नेते उघड पवित्रा घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ‘अरे ला कारे’ने उत्तर देणाऱ्या ना. पाटील यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीने शिवसेनेला चाप देणे शक्य होईल, असा नेतृत्वाचा मानस आहे. याशिवाय विकास निधीत झुकते माप मिळणे शक्य होणार. दुसरीकडे, जिल्ह्यात काँग्रेस अजूनही बळकट असून राष्ट्रवादीचासुद्धा प्रभाव आहे. आगामी निवडणुका आघाडीत लढण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. भाजप युती करेलच आणि केली तर सन्मानजनक वाटा देईल, याची शिंदे गटाला खात्री नाही. यामुळे शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी ना. पाटील यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हेही वाचा >>> गडचिरोलीमधील सूरजागड येथे प्रस्तावित वाढीव उत्खननामुळे १३ गावांवर विस्थापनाचे संकट
‘मिशन-४५’ विरोधात धूर्त खेळी
‘मिशन-४५’ अंतर्गत भाजपने बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे भाजपला ‘ताळ्यावर’ आणण्यासाठीही पालकमंत्री ना. पाटील यांच्या आक्रमकतेची मदत होईल, असे छुपे डावपेचदेखील यामागे आहे. विरोधकांसह मित्र पक्षाच्या काट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिंदे गटाने या ना. पाटील यांना ‘पालक’ केले आहे. ते कितपत यशस्वी होतात हे नजीकच्या काळात कळेलच, पण त्यांचा शिवसेनेसोबत संघर्ष तीव्र होणार, हे निश्चित.