राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
साहित्यिकांनी कधीही राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये. महाराष्ट्रात साहित्यिकांनी सत्तेची कधीही खिदमत केली नाही. ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करायला लागतील त्या दिवशी साहित्य संपून जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पद्मगंधा प्रतिष्ठान व साहित्य विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग, खासदार अजय संचेती, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे, स्वागताध्यक्ष प्रा. भाऊराव बिरेवार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. प्रज्ञा आपटे, माजी कुलगुरू एस.टी देशमुख उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देशात असिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्याच्या कारणावरून पुरस्कार परत केले जात आहेत. मात्र, देशात तसे वातावरण नसून ते निर्माण केले जात आहे. माझ्यावर जन्मजात सहिष्णुतेचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे भविष्यात माझ्यावर कितीही टीका झाली तरी मला दिलेले पुरस्कार आणि मानपत्र कधीही परत करणार नाही, असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात पुरस्कार परत करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
जोपर्यंत साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राला राजमान्यता लाभत नाही, तोपर्यंत या क्षेत्राच्या विकासात अनेक अडचणी असतात. राजमान्यता नाकारल्यानंतरही साहित्य क्षेत्र जिवंत राहिले आहे. साहित्य, संस्कृती आणि कला माणसाला वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करते. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले.

Story img Loader