लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत चिकनगुनिया आजाराचा प्रत्येक महिन्यात नवीन उच्चांक नोंदवला जात आहे. मागील २८ दिवसांत शहरात तब्बल ४०१ नवीन रुग्ण आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रातूही चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात घरोघरी चिकनगुनिया सदृष्य रुग्ण आढळत असून या आजारावर नियंत्रणात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे.

महापालिकेतील आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, नागपूर शहरात १ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान चिकनगुनियाचे ४०१ रुग्ण आढळले. ही संख्या चाचणी केलेल्या रुग्णांची आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील अनेक खासगी डॉक्टर लक्षणे बघूनच चाचणी न करता थेट उपचार करीत असल्याने यापेक्षा अनेक पटींनी जास्त रुग्ण असल्याचा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आणखी वाचा-अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्‍या जिल्‍हा प्रमुखावर गोळीबार; कारची काच फुटली….

शहरात जून- २०२४ पासून चिकनगुनियाचे रुग्ण सातत्याने आढळत आहेत. त्यानंतर सातत्याने प्रत्येक महिन्यात या रुग्णांची संख्या वाढत आहे. सप्टेंबरमध्ये शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आजार नियंत्रणासाठी सर्वत्र कीटकनाशक फवारणी, रुग्णांचे सर्वेक्षण असे उपाय केले जात असल्याचा महापालिकेचा दावा आहे. परंतु त्यानंतरही शहरात सर्वत्र सातत्याने हे रुग्ण वाढत असल्याने नागपूर महापालिकेच्या दाव्यासह कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिकनगुनिया म्हणजे काय ?

चिकनगुनिया या आजाराला चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप देखील म्हणतात. हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग डेंग्यू तापासारखा दिसतो, आणि तो तीव्र, कधी कधी सतत, सांधेदुखी (संधिवात), तसेच ताप आणि पुरळ यांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. हे क्वचितच जीवघेणे असते.

आणखी वाचा-पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!

चिकनगुनियाची लक्षणे काय ?

चिकनगुनिया या आजारात संसर्ग होऊन अचानक दोन ते बारा दिवस ताप येतो. या आजारात लहान सांध्यांना सूज येण्यासोबत किंवा त्याशिवाय सांधेदुखीचा त्रास होतो. सांधेदुखी अनेकदा खूप गंभीर असते, परंतु ती सहसा काही दिवस किंवा आठवडे टिकते. कधीकधी, सांधेदुखी अनेक महिने टिकून राहते. काही रुग्णांना पुरळ देखील येत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.

चिकनगुनिया रोग कशामुळे होतो?

चिकुनगुनिया हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य रोग आहे. जो चिकुनगुनिया विषाणूमुळे होतो, जो टोगाविरिडे कुटुंबातील अल्फाव्हायरस वंशातील आरएनए विषाणू आहे. चिकुनगुनिया हे नाव किमाकोंडे भाषेतील एका शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ आहे “विकृत होणे” आहे.

आणखी वाचा-हृदयद्रावक! स्कूल व्हॅनने विद्यार्थ्याला चिरडले; घटनास्थळीच सोडला जीव

चिकनगुनियाची २०२४ मधील स्थिती

महिना रुग्ण
जून ३०
जुलै ८८
ऑगस्ट ३५५
२८ सप्टेंबर पर्यंत४०१
एकूण ८७४