लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत डेंग्यूच्या तुलनेत चिकनगुनियाचे रुग्ण चारपट आढळले आहेत. या दोन्ही आजारावर नियंत्रणात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही यश मिळाले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे मंगळवारी शतक पूर्ण झाले.

नागपूरच्या शहरी भागात १ जानेवारी ते २७ ऑगस्ट २०२४ दरम्यानच्या काळात डेंग्यूचे १०४ तर चिकनगुनियाचे तब्बल ३८६ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांमध्ये केली गेली. ऑगस्ट महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ५३ तर चिकनगुनियाचे २६८ रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान आजार नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात तापाच्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्याअंतर्गत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन पाणी साठवलेल्या जागांची पाहणी करत आहेत. त्यात हजारो घरांमध्ये डेंग्यूच्या डास अळ्या आढळत असून त्या नष्ट केल्या जात आहे.

आणखी वाचा- हे काय..! पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा

ही काळजी आवश्यक…

डेंग्यू व चिकनगुनिया हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. उपराजधानीतही हल्ली सवर्त्र डास वाढल्याचे चित्र आहे. डासांपासून वाचण्यासाठी मुले खेळायला जाताना मुलांना आणि स्वतःलाही संपूर्ण अंगभर कपडे घालावे. जास्तीत जास्त शरीर झाकण्याचा प्रयत्न करावा. झोपताना तुम्ही नियमित मच्छरदाणीचा वापर करावा. चांगल्या सुरक्षेसाठी मच्छर चावणार नाहीत अशा क्रिमचा अंगावर उपयोग करावा. घरात डास वाढू नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूवर रोख लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील स्वच्छता पाळणे. आपल्या घरातील स्वच्छता पाळावी. स्वयंपाकघरात पाणी साठू देऊ नये. डेंग्यूचे डास पसरणार नाही याची काळजी घरापासूनच घ्यायला सुरूवात करा. जमलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास लवकर येतात आणि त्यामुळे वेळोवेळी पाणी स्वच्छ करा आणि कुठेही घरात पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचे वेळीच निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार शक्य आहे. त्यामुळे रुग्णाला अति ताप, डोकेदुखी, उलटी, डोळ्यांमधील जळजळ, मसल्स आणि सांधेदुखी अथवा शरीरावर आलेले रॅशेससह इतर कोणतेही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. डेंग्यू अथवा चिकनगुनियाची लक्षणे दिसल्ययास त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावा.

आणखी वाचा-वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या

२०२४ मधील स्थिती

महिना डेंग्यू चिकनगुनिया
जानेवारी ०० ००
फेब्रुवारी ०६ ००
मार्च ०२००
एप्रिल ०१ ००
मे ०४ ००
जून ०८ ३०
जुलै ३० ८८
ऑगस्ट५३ २६८
एकूण १०४३६८