यवतमाळ : क्रिकेट खेळण्यासाठी गावाबाहेरच्या शेतात क्रिकेट पिच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली दबून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. आर्यन जयेश चव्हाण (१०) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना पुसद तालुक्यातील वडसद येथे शनिवारी सायंकाळी घडली.
वडसद येथे शेतामध्ये क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी काही मुलांनी मोठा सिमेंटचा पाईप आणला. क्रिकेट पीच तयार करून पाईप शेतातच पीचजवळ ठेवला होता. काही शाळकरी विद्यार्थी त्या ठिकाणी खेळावयास गेले असता, त्या पाईपखाली येऊन आर्यन चव्हाण याचा जागेवरच मृत्यू झाला. आर्यन हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. तो वडसद येथे आजी-आजोबाकडे राहत होता. त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते.
हेही वाचा – नागपूर : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळी गडकरी, फडणवीसांचे ‘ गाव चलो ‘
क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळायला गेलेल्या मुलांपैकी काहींनी पाईप ढकलला. दुर्दैवाने त्या पाईपखाली आर्यन सापडला. पाईप आर्यनच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.