भंडारा : खेळता खेळता दीड वर्षांचा चिमुकला पाण्याच्या बादलीजवळ गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पालगाव येथे ही घटना घडली. अथर्व राहुल बावनकर (१ वर्ष ९ महिने )असे या चिमुकल्याचे नाव आहे.
मुलं लहान असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पालकांचे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष झाल्यास मुलं काय करतील हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत पालगाव येथील एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा करुण मृत्यू झाला आहे. भंडारा तालुक्यातील पालगाव येथे शालिकराम आणि कांताबाई बावनकर हे वृद्ध दाम्पत्य महेंद्र आणि राहुल या त्यांच्या दोन मुलांसोबत एकाच घरात पण वेगवेगळे राहतात. कांताबाई यांचा धाकटा मुलगा राहुल याला ६ वर्षाचा रेहान आणि दीड वर्षांचा अथर्व अशी दोन मुले आहेत. शनिवारी दुपारी राहुल आणि त्यांची पत्नी हे दोघेही कामावर गेलेले असताना मृतक अथर्व हा इतर सम वयस्क मुलांसोबत घरी खेळत होता. अथर्वचे आजोबा आजी त्यांच्या कामात व्यस्त होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास खेळता खेळता अथर्व अंगणात असलेल्या मोऱ्हीत गेला. तेथे २० लिटरची एक पाण्याने भरलेली बादली ठेवलेली होती. पाण्याचा खेळ करीत असताना अथर्वचा तोल गेला आणि तो बादलीत पडला. डोक्याच्या भरावर पडल्यामुळे त्याच्या नाका तोंडात पाणी गेले. काही वेळानंतर अथर्व दिसत नाही म्हणून आजीने जाऊन पाहिले असता आजीला तो पाण्याच्या बादलीत निपचित पडलेला दिसला. अथर्वला अशा अवस्थेत पाहताच आजी कांताबाई यांनी आरडाओरडा केला. घरात काम करीत असलेली त्यांची मोठी सून शारदा काय झाले म्हणून धावत बाहेर आली. त्यावेळी अथर्व तिला पाण्यात बुडालेला दिसला. शारदा हिने ताबडतोब
अथर्वला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच राहुल आणि त्यांची पत्नी घरी आले. पोटच्या गोळ्याचां मृतदेह पाहताच दोघांनीही हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बावनकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतक अथर्वची आजी कुंता शालीकराम बावणकर यांच्या लेखी तक्रारीवरून घटनेची नोंद कारधा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे..