लोकसत्ता टीम
अमरावती : राजेश काल्या भुसूम (३५) रा. काटकुंभ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजेश याची पत्नी अश्विनी ह्या घराच्या ओट्यावर बसून त्यांच्या तीन महिन्यांची चिमुकली मुलगी अक्षिता हिला अंगावर दूध पाजत होत्या. त्यावेळी तू मला विचारल्याशिवाय मका का विकला, अशी विचारणा करून राजेशने पत्नी अश्विनी यांच्यासोबत वाद घातला.
वाद विकोपाला गेल्याने राजेशने पत्नी अश्विनी यांना अचानक लाथ मारली. त्यामुळे अश्विनी यांच्या अंगावरील तीन महिन्यांची चिमुकली अक्षिता ही जमिनीवर पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारार्थ काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर अश्विनी यांनी चिखलदरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी राजेशविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा-राहुल गांधींच्या हातातील संविधानाच्या आत केवळ कोरी पाने! भाजपच्या आरोपाने खळबळ….
पती, पत्नीमधील टोकाचा वाद हा एक दुर्देवी घटनेमध्ये रुपांतरीत झाला. या घटनेला दारिद्र्याची देखील किनार आहे. मेळघाटात अनेक आदिवासी कुटुंब विपरित परिस्थितीत जगत आहेत. जमिनीच्या छोट्या तुकड्यावर शेती करून आदिवासी गावकरी आपला उदरनिर्वाह करतात. भूसूम कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यातच पत्नीने न विचारता मका विकल्यामुळे आरोपी राजेश याला राग आला.
आपली मुलगी दूध पित असल्याचे भानही त्याला राहिले नाही. राजेशची पत्नी बेसावध असताना त्याने लाथ मारली आणि राजेशच्या पत्नीच्या कुशीतील चिमुकली मुलगी ओट्यावरून खाली पडली. गंभीर जखमी अवस्थेतील या चिमुकलीला काटकुंभच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तिचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा-महत्त्वाचे! निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात, जाणून घ्या…
घराच्या ओट्यावर बसून चिमुकल्या मुलीला अंगावरील दूध पाजत असलेल्या पत्नीला पतीने मका विकल्यावरून उद्भवलेल्या वादात अचानक लाथ मारली. त्यामुळे दूध पीत असलेली चिमुकली खाली पडली. त्यात चिमुकली गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील काटकुंभ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी पतीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.