लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

शारीरिक अथवा मानसिक व्यंग घेऊन जन्मलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जुनेवाणी हिंगणा येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच ‘इन्स्पायर’या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रात मुलांवर उपचारापासून त्यांच्यासाठी रोजगारापर्यंतचे प्रयत्न केले जातील, अशी माहिती ‘इन्स्पायर’चे संयोजक व बालअस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता डॉ. शिंगाडे बोलत होते. ते म्हणाले, इन्स्पायर म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, पेडियाट्रिक आर्थोपेडिक आजार पुनर्वसन केंद्र. हे केंद्र नागाई नारायणजी मेमोरियल फाऊंडेशन रिसर्च विंगकडून संचालित केले जाते. सध्या वेगवेगळ्या देशातील विविध संस्थांच्या अभ्यासात एकूण लोकसंख्येच्या ११ ते १५ टक्के नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. भारतात ही आकडेवारी २ टक्के असल्याची सरकारी आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात भारतातही अपंगत्वाचे प्रमाण जास्त आहे. परंतु सरकारी दावा खरा मानला तरी भारतातील अपंग मुलांची संख्या खूप मोठी आहे.

हेही वाचा >>>अबब… १२० किलोचे कासव; “तो” आमच्या देवाचा, आमच्या तलावात परत सोडा

ही बाब लक्षात घेऊन इन्स्पायरच्या वतीने १८ एकर भूखंडावर पुनर्वसन प्रकल्प सुरू झाला आहे. टप्प्या- टप्प्याने त्याचा विकास होईल. पहिल्या टप्प्यात साडेचार एकर परिसरात या मुलांसाठी विशेष मनोरंजन उद्यान (कुठेही व्हिलचेअर जाईल असे), व्यवसायोपचार व भौतिकोपचार उपचाराची सोय, अपंगांसाठी लागणाऱ्या साहित्यांची निर्मिती, अपंग मुलांसह त्यांच्या पालकांना सुमारे १५ दिवस ते १ महिना प्रशिक्षण देण्यासाठी राहण्याची सोय, शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची सोय, मुलांना येथे सुमारे महिनाभर राहण्याची गरज पडल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुशल शिक्षकांची सोय करण्यात आली आहे. सध्या येथे एकाच वेळी १०० मुलांवर भौतिकोपचाराची सुविधा आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे रुग्णालय, कौशल्य प्रशिक्षण केंद्रासह इतरही सेवा उपलब्ध केल्या जातील. जेणेकरून येथे एकदा अपंग मुलगा आल्यास उपचारापासून रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षणही दिले जाईल. उपचार पूर्णपणे नि:शुल्क राहणार आहे. परंतु सधन कुटुंबांकडून काही प्रमाणात शुल्क आकारले जाणार असल्याचेही डॉ. विराज शिंगाडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चंद्रपूर: राज्यात ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लाख घरे निर्माण करणार; सुधीर मुनगंटीवार

भविष्यातील नियोजन…

इन्स्पायरमध्ये भविष्यात विशेष शिक्षक तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना चांगल्या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क केला जाणार आहे. या कंपन्यांनी रस दाखवल्यास त्यांच्या गरजेनुसार येथे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून मनुष्यबळ तयार केले जाईल, असेही डॉ. विराज शिंगाडे यांनी सांगितले.

पंधरा हजारांवर मुलांवर निःशुल्क उपचार

संस्थेकडून आदिवासी व दुर्गम भागात नियमित मोफत शिबिरे घेतली जातात. जन्मजात हात-पाय वेडेवाकडे असलेल्या (डोर्सल क्लोण्ड ऑस्टिओरोमी फाॅर क्लब फुट डिफमेंटी) गरीब मुलांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते. आजपर्यंत चार हजारांवर मुलांवर आम्ही शस्त्रक्रिया केल्या. सात हजार अपंग मुलांना लागणारी साधने नि:शुल्क दिली. १५ हजारांवर मुलांना मोफत भौतिकोपचाराची सोय उपलब्ध केल्याचेही डॉ. शिंगाडे यांनी सांगितले. जन्मजात हात-पाय वेडेवाकडे असलेल्या मुलांवर शस्त्रक्रियेचे डॉ. विराज शिंगाडे यांनी अद्ययावत तंत्र विकसित केले आहे. या तंत्राचे प्रशिक्षण अमेरिका, कॅनडा, रशिया आदी देशातीलही तज्ज्ञ डॉक्टरांनीही घेतले, हे विशेष.

अपंगत्वावर मात केलेली मुले अग्रेसर

यशस्वी शस्त्रक्रिया केल्यावर अनेकांना सन्मानाचे जीवन प्राप्त झाले आहे. बिलासपूर येथील आशीष सखुजा याचे पाय वाकडे होते. त्याने शस्त्रक्रियेनंतर इंग्लंड, सिंगापूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनमध्ये पदके मिळवली. इतरही अनेक मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव मोठे केले, हे डॉ. विराज शिंगाडे यांनी आवर्जून सांगितले.