नागपूर जिल्ह्यामध्ये बालविवाहाचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये राहणारी १२ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पालकांनीच तिचा प्रियकरासोबत बालविवाह लावून दिलाय. पती-पत्नी म्हणून या दोघांचा संसार सुरू असताना आशा वर्कर्सच्या सर्वेक्षणात हा प्रकार लक्षात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अल्पवयीन मुलीचा पती तसेच वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलगी मूळची मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. बालपणातच तिच्या आईचा आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे तिचे वडील मुलीला घेऊन कामाच्या शोधात नागपुरात आले होते. तिसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यानंतर जबाबदारीमुळे मुलीला मध्येच शिक्षण सोडावे लागले. दरम्यान आरोपी अभिलाश कटोते (२२) हा या मुलीच्या घराशेजारीच राहतो. तो एका धान्य व्यापाऱ्याकडे मजूर आहे. कालांतराने अल्पवयीन मुलगी आणि आरोपी अभिलाश कटोते यांच्यात जवळिक निर्माण झाली. त्यानंतर मुलीची अचानकपणे प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले.

गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर मुलीने अभिलाशचे नाव सांगितले. तर अभिलाशनेही दोघांमध्ये प्रेमसंबंध असून बाळ आपलेच असल्याची कबुली दिली. त्यानंतर कुटुंबियांच्या सहमतीने गर्भवती असलेल्या १२ वर्षांच्या मुलीसोबत अभिलाशचे फेब्रुवारी महिन्यात लग्न लावून देण्यात आले. दोघांनीही वेगळे घर भाड्याने घेतले आणि संसार थाटला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी आशा वर्कर्स सर्वेक्षणासाठी वस्तीत आल्या असताना त्यांना हा प्रकार समजला.

आशा वर्कर्सनी लगेच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांना याबाबत माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी बालविवाह आणि बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अभिलाशला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child marriage in nagpur 12 year old minor girl forced to marry with 22 year old boy in nagpur prd