यवतमाळ : घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने आम्ही परिवाराला नको असतो. मात्र, आमच्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सर्व जातीधर्माची लोक एकत्र राहतात. खऱ्या अर्थाने तृतीयपंथियांच्या घरात भारत वसतो, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. येथील आझाद मैदानात १५ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात मंगळवारी आयोजित प्रकट मुलाखतीत सतीश राणा यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळेत असताना बायकी चालीमुळे मुले टॉर्चर करायचे. त्यामुळे नापास होण्याच्या भीतीने दहावीची परीक्षा दिली नाही. दुसऱ्या वर्षी कॉपी चालणाऱ्या केंद्रातून परीक्षा दिली आणि पास झाले. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अशाप्रकारे पुढे ढकलण्यात आले. मात्र, शिक्षण व्यवस्था अशाप्रकारे तुम्हाला पास करून पात्र बनवित नाही. आयुष्यात एकप्रकारे थांबण्याचा अधिकार देते. वर्गात, बाहेर, घरी झालेल्या मानसिक त्रासामुळे अभ्यासातून लक्ष विचलित झाले. त्याचे परिणाम आजही भोगत आहे. संमेलन, विद्यालय, महाविद्यालयात भाषण करण्यासाठी बोलाविले जाते. हातात पदवी नसल्याने नोकरी मिळू शकत नाही, अशी खंत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…

शारीरिक व मानसिक शोषण चौदाव्या वर्षापासून सुरू होते. मुलींना आपण ‘गुडटच-बॅडटच’ शिकवतो. मात्र मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार होतात. त्यांना त्याबद्दल कुणी विचारणा करीत नाही. पुरुष यावर व्यक्त झाल्यास त्यांच्यातच खोट काढली जाते. दोन्हीकडून पुरुषांचा कोंडमारा होतो. दिव्यांग, अंध, मूक मुलांचा सांभाळ पालक करतात. अशी सहानुभूती पालक तृतीयपंथियाबद्दल बाळगत नाही. आई-वडील स्वार्थी आहेत. मुले त्यांच्यासाठी फिक्स डिपॉझिट आहेत. नफा मिळायला लागला की, आनंदी होतात आणि मनासारखे झाले नाही तर बँक बुडल्यासारखे त्यांना वाटते. स्वत:च्या व्यसनी मुलाला सुधरविण्याच्या नादात दुसऱ्याची लेक सून म्हणून घरात आणून तिच्या आयुष्याची राखरांगोळी करतात, यावर दिशा पिंकी शेख यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

हेही वाचा – अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले? मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…

आजाराचे नैतिक-अनैतिक प्रकार आहेत. कॅन्सर असलेल्या रुग्णाशी सहानूभूती बाळगली जाते. काही लोक स्वत:ही टक्कल करून घेतात. येथे नैतिकता दाखविली जाते. तर एचआयव्ही झालेल्या व्यक्तीबद्दल अनैतिकता दाखविली जाते, असे मत दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children are also victims of good touch bad touch what did social activist disha pinki sheikh say at the ambedkari sahitya sammelan at yavatmal nrp 78 ssb