अनिल कांबळे
मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात मुलांच्या चुकीमुळे किंवा पॉईंट जिंकण्याच्या उत्सुकतेमुळे पालकांचे बँक खाते रिकामे होऊ शकते. कारण अनेक मोबाईल गेममध्ये सायबर गुन्हेगार लिंक पाठवत आहेत. तसेच रिवॉर्डच्या नावावर मुलांना आमिष दाखवून पालकांच्या बँक खात्याची माहिती काढून घेत असल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. अशा बऱ्याच तक्रारी सायबर गुन्हे विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
लहान मुलांना मोबाईलचे एवढे वेड लागले आहे की, मोबाईलवर खेळण्यासाठी मुले अक्षरश: पालकांशी वाद घालतात. या हट्टापायी अनेक पालक मुलांना मोबाईल देतात. गेम खेळण्यासाठी मुले ‘प्ले स्टोअर’ किंवा विविध लिंकवर क्लिक करतात. मनोरंजन म्हणून गेम खेळताना बक्षीस जिंकण्याच्या नादात मुले सायबर गुन्हेगारांच्या जाळय़ात अडकत आहेत. पालकांचा मोबाईल क्रमांक बँकेशी संलग्न असतो. याच बाबींचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार लहान मुलांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल जिंकण्यासाठी वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करतात. सायबर गुन्हेगारांकडून आलेल्या लिंकवर मुले क्लिक करतात. त्यामुळे या गुन्हेगारांना मोबाईल हाताळण्याची परवानगी मिळते. मग ते बँकेचे व्यवहार हाताळतात.
काय काळजी घ्याल?
फ्री फायरसारखे गेम खेळण्यासाठी मोबाईलवरून परवानगीची मागणी होते. गेम खेळण्यासाठी मुले परवानगी देतात. अशा गेममध्ये लेव्हल क्रॉस करावी लागते. पॉईंट्स संपले की पुढील टप्पा खेळण्यासाठी पॉईंट विकत घ्यावे लागतात. ते डॉलरमध्ये असतात. त्यामुळे पालकांनी टॉप अप करून देऊ नये. अन्यथा ते ऑटो परचेस होऊन बँक खात्यातून लाखो रुपये उडवले जाऊ शकतात.
‘ई-मेल पासवर्ड’ होऊ शकतो ‘हॅक’
मोबाईलचा ताबा मिळविल्यानंतर सायबर गुन्हेगार त्यामधील ई-मेल आयडी आणि त्याचे पासवर्ड हॅक करतात. तसेच बँक अॅपवरही ताबा मिळवून पैसे परस्पर आपल्या खात्यात वळते करतात. खात्यातून पैसे निघाल्याचा संदेशही मोबाईलवर येत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येत नाही.
पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये. अनेक खेळांमध्ये बँकेची माहिती संलग्नित करण्यास सांगितले जाते. पाल्यांना माहिती नसल्यामुळे ते परवानगी देतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार थेट बँक खात्याचा वापर करतात. पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. -अमोल दौंड, पोलीस अधिकारी, सायबर विभाग.