नागपूर : लहान मुलांनी अभ्यासाचा कंटाळा करणे, जेवणासाठी नकार देणे ही तशी नित्याचीच बाब. मुलांचा असा हट्टीपणा अनेकदा पालकांनाही त्रस्त करतो. हीच बाब लक्षात घेऊन श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या स्टार्टअपने ‘माईन्डफुल गुरुकुल ॲप’ विकसित केले आहे. हे ॲप एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय प्रभावशाली ठरत आहे. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्याचे सादरीकरण करण्यात आले.
करोनामुळे अभ्यासासाठी मुलांच्या हातात भ्रमणध्वनी आला. मात्र, आता त्याच भ्रमणध्वनीमुळे मुलांमध्ये एकाकीपण, चिडचिडेपणा आणि अभ्यासात एकाग्रतेचा अभाव वाढत आहे. याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक जीवनावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत ही समस्या ओळखून त्याचे निदान करणे अत्यंत गरजेचे असते. डॉ. चिराग जैन आणि दर्शना जैन यांनी मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी हे ॲप विकसित केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
हेही वाचा >>> आता रेशन दुकानातही बेरोजगारांची नोंदणी होणार, ‘रोजगारी’ ॲप विकसित
भावनांचे ‘ट्रॅकिंग’
अभ्यास करत असताना हा ॲप भ्रमणध्वनीमधील इतर ९० टक्के ॲप बंद करतो. त्यानंतर मुलांच्या मनात सुरू असलेल्या भावनांचे ‘ट्रॅकिंग’ करीत त्यादृष्टीने त्यांच्या मनस्थितीत बदल करण्यासाठी तीन मिनिटांची ध्यान साधना, संगीत आणि इतर मनःशातीचे साधन उपलब्ध करून देतो. त्यानंतर दिलेल्या वेळात आपला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी सांगतो. विशेष म्हणजे, हे करीत असताना मुलाचे पुन्हा ‘ट्रॅकिंग’ करून त्यादरम्यान निर्माण होणारा तणाव आणि अस्वस्थता याचे मोजमाप करण्यात येते. त्यानंतर त्याला पुन्हा मानसिक व्यायाम करण्यास सांगितले जाते.