चंद्रपूर: छत्रपती शंभाजी महाराज यांच्या विरोधात समाज माध्यमावर (इन्स्टाग्राम) अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या एका आरोपीला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. महाराजांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट टाकल्यामुळे संभाजी बिग्रेडच्या शिवप्रतिष्ठान समुहाने आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्याच्या दुकानाची तोडफोड केली. चिमूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेमुळे चिमुरात रात्री बारा ते एकच्या दरम्यान प्रचंड तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलिस प्रशासनाने दंगानियंत्रक पथकाला रात्री बोलावून चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे. सध्या चिमुरात तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. अल्ताफ (सोनू) इमदाद शेख (वय २१) रा. नेताजी वार्ड असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेख याने गुरुवारी समाज माध्यमावर (इन्स्टाग्राम) छत्रपती शंभाजी महाराजांच्या विरोधात पोस्ट टाकली. दिवसभर समाज माध्यमावर पोस्ट पाहिल्यानंतर रात्री संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी चिमूर पोलिसात तक्रार केली. त्यांनी या प्रकाराचा निषेध करीत महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यांनतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून लगेच आरोपीला अटक करण्यात आली. हजारे पेट्रोल पंपाजवळील संभाजी चौकात संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध करीत प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर आरोपीच्या दुकानाकडे मार्चा वळविला. नेहरू शाळापरिसरातील दुकानावर हल्लाबोल केला. दुकानाची तोडफोड केली. दुकानासमोर टायरची जाळपोळ केली. पिंजऱ्यातील कोंबड्या बाहेर सोडल्या. लगतच्या दुकानाचीही नासधूस करण्यात आली. पाहता पाहता या घटनेचे लोण शहरात पसरले. नागरिकांची मोठी गर्दी झाली. रात्री बारा ते एकच्या सुमारास चिमूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिसांची तैनाती करण्यात आली. दंगा निययंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
पोलिसांच्या ताब्यातील आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेखवर जमावाचा रोष वाढत होता. त्यामुळे त्याला भिसी पोलिस स्टेशनमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. लगेच आरोपीला पोलिस ठोणे भिसी येथे रात्रीच नेण्यात आले. परंतु सदर घटनेचेची माहिती सर्वत्र पसरल्याने भिसी पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा जमाव झाला. तेथेही परिस्थिीती चिघळत असल्याने आरोपीला रात्रीच पुन्हा चिमूर पोलिस ठाण्यात परत आणण्यात आले. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे रात्री घटनास्थळी दाखल झाले. चोख पोलिस बंदोबस्त वाढविला आणि परिस्थिती हाताळली.