नागपूर : भारत आणि चीन सीमेवर भारतीय वायुदल डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. चीनचे युद्ध विमान आपल्या वायु क्षेत्राचे उल्लंघन करीत नाही. केवळ भारताला खिजवण्यासाठी म्हणून कधी कधी सीमा रेषेच्या अगदी जवळ येत असतात, असे प्रतिपादन अनुरक्षण कमानाचे वरिष्ठ वायू आणि कर्मचारी प्रशासकीय अधिकारी एअर वाईस मार्शल एम.व्ही. रामाराव यांनी केले.
प्रहार समाज जागृती संस्थाच्या वतीने सिव्हिल लाईन्स चिटणवीस सेंटरमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एका विद्यार्थीच्या प्रश्नाच्या उत्तरात रामाराव म्हणाले, शांतता काळातील आणि युद्ध काळातील सीमारेषा ठरलेल्या आहेत. ती आंतराष्ट्रीय सीमेच्या पाच किंवा दहा कीलोमीटरपर्यंत असू शकते. दोन्ही देश त्यांचे पालन करीत असतो. या वायु क्षेत्राचे उल्लंघन केल्यास काय करायचे हे आपल्याला चांगले ठावूक आहे.
वायुदलाकडे चीनच्या युद्ध विमानांच्या हालचाली टिपण्याची यंत्रणा आहे. विमानांच्या उडानाची पूर्व सूचना प्राप्त होत असते. चीनचे युद्ध विमान सीमेरेषेपासून अगदी जवळून उडत असल्याची माहिती देखील मिळते. त्यांच्याकडे देखील अशाप्रकारची माहिती देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे कोणीही वायु क्षेत्राचे सहसा उल्लंघन करीत नाही. पण ते शत्रू राष्ट्राकडून होणारच नाही, असा कोणीही दावा करू शकत नाही. त्यामुळेच कायम दक्ष असणे आणि शत्रुच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यकता असते.
तर पाक व्याप्त काश्मीर भारतात
पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. तो एक दिवस भारताला परत मिळेल. परंतु ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी आवश्यक आर्थिक बळ, लष्करी सामर्थ आणि याबाबत जागतिक पातळीवरची स्थिती या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. काही देश पीओके न म्हणता भारत व्याप्त जम्मू-काश्मीर म्हणता, भारत व्यक्त जम्मू कश्मीर म्हणतात याकडेही एअरमार्शल रामराव यांनी लक्ष वेधले.