यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या घटनेनेनंतर यवतमाळच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली असून, मोटर वाहन निरीक्षकांनी आज शनिवारी दुपारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात धडक देत बसेससह कागदपत्रांची तपासणी केली.
हेही वाचा >>>विवाह संकेतस्थळावरील कथित वधू-वरांपासून सावधान! लग्नाच्या नावावर उकळतात पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी प्रवशांमध्ये यवतमाळ येथील सहा प्रवासी, पुसद येथील चार, वाशिम येथील नऊ, डोंबिवली, कसारा, केवड येथील प्रत्येकी एक, मुंबईतील सहा, तर जालना येथील दोन प्रवाशांचा समावेश आहे. स्लीपर कोच असलेल्या या बसमध्ये ३० प्रवाशी क्षमता असताना ५३ प्रवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये कसे आले, याचा तपास आता परिवहन विभागाने सुरू केला आहे. मोटर वाहन निरीक्षकांनी आज चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसेसची तपासणी केली. एसी स्लीपर कोच बसेस प्रवासासाठी योग्य आहेत का? बसची आंतर्बाह्य उंची, लांबी, रुंदी, तसेच दोन बर्थ मधील गँगवे, इमर्जन्सी डोअर व पॉइंटेड हॅम्मर, जीपीएस यंत्रणा, स्पीड गव्हर्नर आदी संपूर्ण बाबी अधिकाऱ्यांनी तपासल्या. दरम्यान, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट देऊन या अपघाताची माहिती घेतली व नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे व नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कसे काय बसवले, याची चौकशी करण्याचे आदेश राठोड यांनी प्रशासनाला दिले.
हेही वाचा >>>गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू ; दोन दिवसात लागोपाठ दुसरा बळी
जखमींची नावे
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अजय देवगण (२३, यवतमाळ), ज्ञानदेव राठोड (३८, पुसद), दीपक शेंडे (४०, यवतमाळ), भगवान मनोहर (६५,वाशिम), सतीश राठोड (२८,यवतमाळ), निकीता राठोड (२६, यवतमाळ), प्रभादेवी जाधव (५०, वाशिम), भागवत भिसे (५८, डोंबिवली), स्वरा राठोड (२, यवतमाळ), रिहाना पठाण (४५, मुंबई), मातू चव्हाण (२२, मुंबई), राहत पठाण (९, मुंबई), फरिना पठाण (२२, मुंबई), बुली पठाण (७५, मुंबई), अमित कुमार (३४, यवतमाळ), सचिन जाधव (३०, पुसद), अश्विनी जाधव (२६, पुसद), हंसराज बागुल (४६, कसारा), आर्यन गायकवाड (८, वाशिम), पूजा गायकवाड (२७, वाशिम), साहेबराव जाधव (५०, वाशिम), गणेश लांडगे (१९, मुंबई), इस्माईल शेख (४५, केवड), अंबादास वाघमारे (५०, वाशिम), पायल शिंदे (९, जालना), चेतन आकाश (४, जालना), किरण चौगुले (१२, वाशिम), अनिता चौगुले (३५, वाशिम), अनिल चव्हाण (२८, पुसद), महादेव धोत्रे (३०, वाशिम), लखन राठोड (२९), मीरा राठोड (६०), पुष्पा जाधव (७), संतोष सरदार (४७), विशाल पतंगे (३०), गजकुमार शहा, त्रिशला शहा, सी.पी. बागडे, वैशाली बागडे, उज्ज्वल यांचा समावेश आहे. या सर्वांवर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.