यवतमाळ: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतात चित्रा वाघ विदर्भ दौऱ्यावर निघाल्या. आज शुक्रवारी त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली. यावेळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या १०० दिवसांत महिलांच्या सन्मानसाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू; वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी

हेही वाचा >>> भंडाऱ्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा; गोसेखुर्द प्रकल्पाचीही करणार पाहणी

याच अनुषंगाने पत्रकारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात केलेले आरोप मागे घेऊन आपणही त्यांना क्लीनचिट दिली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा आपली संजय राठोड यांच्याविरोधात सुरू असलेली लढाई त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राठोड यांना मंत्रीमंडळात घेतले. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करून त्यांचे राजकीय जीवन उद्धवस्त केले नाही काय, असा प्रश्न एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारताच वाघ यांनी, तुम्ही संजय राठोड यांच्याकडून सुपारी घेतली काय, असा प्रतिप्रश्न केला. बहुतांश पत्रकारांना वाघ यांनी प्रश्न विचारू दिले नाही. त्यामुळे पत्रकार आणि वाघ यांच्यात वादाची ठिणगी उडाली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> नागपूर : राज्यात रोजगार मेळाव्यांच्या खर्च मर्यादेत वाढ, प्रसिद्धीवर २० टक्के खर्चाची अट

न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार

संजय राठोड यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण व परिवाराने खूप त्रास सहन केला, असे वाघ म्हणाल्या. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादानंतर पत्रकारांनी वाघ यांचा निषेध नोंदवून सर्व पत्रकार पत्रपरिषदेतून बाहेर पडले.

‘आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षित नव्हत्या’

मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर कोणाचेही नाव न घेता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला. एका पक्षाची नेता किंवा नेत्याच्या मुलीबद्दल कोणी काही बोलले तर त्यातून समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला, असे बिंबविण्याची सुरू झालेली पद्धत बंद झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. राज्यात स्त्री-पुरुष समानता आहे. महिलांनाही समान अधिकार आहेत. त्यामुळे सर्व महिलांचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षित नव्हत्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने महिला सन्मान आणि सुरक्षाविषयक धोरणे आखल्याने महिलांना अधिक सुरक्षितता लाभत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh angry on journalists when asked about sanjay rathod ysh
Show comments