नागपूर : भारतीय जनता पक्षासह महायुतीमध्ये निवडणुकीसाठी इच्छुक महिला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना अन्य राजकीय पक्षांना मात्र महिला उमेदवार शोधाव्या लागतील, असे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
भारतीय जनता पक्षातर्फे महिला आघाडीची शक्ती वंदन अभियानाला नागपुरात सुरुवात झाली. या अभियानाच्या निमित्ताने चित्रा वाघ नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमाशी बोलत होत्या. भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने संघटन वाढवण्यासाठी काम करत नाही, मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने काढलेली स्त्री शक्ती संवाद यात्रा ही निवडणुका समोर ठेवून सुरू केली आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : शिकारीच्या शोधात वाघाचा विहिरीत पडून मृत्यू
प्रत्येक राजकीय पक्षाला संघटन वाढवण्याचा अधिकार असला तरी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे अनेक जिल्ह्यांत महिला आघाडी राहिलेली नाही. अशी स्थिती अन्य राजकीय पक्षाची असल्यामुळे आगामी निवडणुकीसाठी महिला उमेदवार शोधाव्या लागतील असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
रश्मी ठाकरे महिला आघाडीचे संघटन वाढविण्यासाठी मैदानात उतरल्या असल्या तरी आता त्यांना उशीर झाला आहे. अडीच वर्ष आधी त्या उतरल्या असत्या तरी उद्धव ठाकरे गटावर ही वेळ आली नसती, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या मेळाव्याला महिलाची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी दिसण्यापेक्षा पक्षात कार्यरत असणे महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या. निवडणुकांसाठी भाजपकडे अनेक कार्यक्षम महिला उमेदवार आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव बघता मेरिटनुसार महिलांना पक्षाकडून निवडणुकीत स्थान मिळेल असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड
शक्ती वंदन अभियान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत राबवणार असून त्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारच्या महिलांसाठी अससेल्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. विविध घटकांतील महिलांशी संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.