अकोला : सरकार म्हणून सध्या उत्तम काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्यांचा इतर ठिकाणी वापर सुरू होता. त्यामुळे त्यांनी आता शहाणपण शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले.
हेही वाचा >>> ईव्हीएम विरोधात चंद्रपूरात वकिलांचा मुकमोर्चा
अकोल्यात पक्षाच्या बैठकीसाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले होते. त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘मविआ सरकार होते, त्यावेळी काय घडत होते, याची माहिती घेतली तर त्यांना कळेल. त्यांचे राज्य होते तेव्हा त्यांनी काय उन्माद केला, हे संपूर्ण राज्याने पाहिले. मुंबईतील वाकोल्यामध्ये एक गंभीर घटना घडली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विशेष अधिवेशन घ्यावे, अशी विनंती केली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांना आता बोलण्याची नैतिकता नाही.’
फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचे एकच काम अंधारेंकडे उरले आहे. अडीच वर्षे आपण सत्तेत असताना काय केले, याचा त्यांना विसर पडला. महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भायाच्या गाड्या तत्कालीन मंत्र्यांनी वापरल्या आहेत. आम्ही त्यांना गाड्यांच्या क्रमांकासह तक्रार दिली होती. यामध्ये मोठ्या ताईंचा देखील समावेश आहे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आदिवासी गटातून आरक्षणासाठी गोवारी समाजाचा एल्गार, चार तासापासून चक्का जाम
महाराष्ट्रासाठी जे चांगले आहे, ते केले जात आहे. विकासाकडे राज्याची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पाेटशूळ उठते. हे तुमच्या सारखे ‘फेसबुक’ सरकार नसून नागरिकांच्या ‘फेस’वर हास्य आणणारे सरकार आहे. सरकार प्रत्येकाच्या दारी पोहचले आहे, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.
मातृशक्ती खंबीरपणे भाजपच्या पाठीशी
महिलांच्या सशक्तीकरणासह आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कार्य केले. केवळ गप्पांचा बाजार न करता सातत्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाममात्र दरावर कर्ज उपलब्ध करून दिले. घरगुती रोजगाराला चालना देण्याचे कार्य केल्यामुळे देशातील मातृशक्ती खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभी आहे. जनसंपर्क करण्याची जबाबदारी महिला आघाडीने स्वीकारावी, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले. अकोला जिल्हा भाजपच्या कार्यालयात महिला आघाडीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.