अकोला : जिल्ह्यातील कासमपुर (पळसो) गावामध्ये कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. रुग्णांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. उद्रेक प्रतिबंधसंदर्भात जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथकाने प्रत्यक्ष गावात उपचारात्मक कार्य युद्धस्तरावर सुरू केले.
कॉलरा उद्रेकावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात सर्वेक्षण केले जात आहे. १२ सर्वेक्षण पथकांद्वारे २०५ घरातील एक हजार २०६ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १ एप्रिलला ११ रुग्ण आढळून आले. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या आठ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सात, तर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णावर उपचार केले जात आहेत. हिवताप तपासणीसाठी सात रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत ओपीडीमध्ये २९ रुग्णांची रुग्णांची तपासणी करण्यात आली. ताप, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखीचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील आठ रुग्ण उपचारातून पूर्णपणे बरे झाले. तपासणीसाठी रक्त नमुने २४, तर पाणी नमुने १८ घेण्यात आले.
कॉलरा उद्रेकावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून उपचार करण्यासाठी तीन वैद्यकीय अधिकारी, दोन सामुदाय आरोग्य अधिकारी, एक आरोग्य सहाय्यक, चार आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, पाच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका आदींच्या पथकांमार्फत कासमपुर (पळसो) गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच पिण्याचे पाणी उकळुन व आर.ओ. पाण्याचा वापर करण्याबाबत नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. आज ‘मेडीक्लोर’चे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येऊन ते पिण्याच्या पाण्यामध्ये टाकण्यात आले. सद्यस्थितीत सर्वेक्षण करण्यात येत असून प्रा.आ. केंद्र पळसो येथे रुग्णांवर औषधोपचार केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परिस्थितीवर लक्ष
कॉलरा उद्रेकाची परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तसेच जिल्हा सर्वेक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने कासमपुर (पळसो) येथे भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना साथ नियंत्रणासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहून ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी आदी कोणतेही लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.