अकोला : राष्ट्रीय महामार्गावर राधास्वामी सत्संग केंद्राजवळील गोदामातून सुमारे ५० लाख रुपयांच्या सिगारेटने भरलेल्या पेट्या तीन चोरट्यांनी लंपास केल्या. परिसरातील चौकीदाराला धमकावून त्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस तपास करीत आहेत.
खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर राधास्वामी सत्संग केंद्राजवळ हकीतराई नावाचे एक गोदाम आहे. या गोदामात विविध कंपन्यांच्या तब्बल ५० लाख रुपयांच्या सिगारेटच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तात पोलीस गुंतल्याची संधी साधून चोरट्यांनी मोठी चोरी केली. तीन चोरट्यांनी चौकीदाराचे हात-पाय बांधून न बोलण्याची धमकी दिली. गोदामाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ६० पेक्षा अधिक पेट्या चोरट्यांनी एका ट्रकमध्ये टाकल्या. त्या ट्रकसह चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी महागड्या सिगारेटच्या पेट्यांवर हात साफ केला. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गोदामाची पाहणी करून माहिती नोंदवून घेतली. चोरीची घटना गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.