लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : अंबाझरीतील पुलाच्या बांधकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची उच्च न्यायालयाने दखल घेऊन व्हीएनआयटीच्या परिसरातून रस्ता सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या संस्थेने मुख्य रस्ता सुरू न करता पर्यायी रस्ता सुरू केला व तोही एकेरी आणि फक्त काही वेळासाठीच. त्यामुळे रस्ता सुरू करूनही वाहतूक कोंडी कायम असल्याने हा तर उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या दीड महिन्यापासून अंबाझरी तलावाजवळील पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यावर पर्याय म्हणून व्हीएनआयटीतील रस्ता खुला करण्याचे ठरले. परंतु व्हीएनआयटीने मुख्य रस्त्याऐवजी पर्यायी रस्ता खुला केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन दिवस उशिरा म्हणजे १८ जुलैला व्हीएनआयटीने परिसरातील रस्ता सकाळी आणि सायंकाळी दोन तासांसाठीच सुरू केला. यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याच्या दृष्टीने काहीच फायदा झाला नाही. याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

आणखी वाचा-वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाची परंपरा खंडित; कारण काय? जाणून घ्या…

आठ दिवसातच रस्ता खचला?

श्रद्धानंदपेठकडून उत्तर अंबाझरी मार्गाला जोडणारा रस्ता तातडीने तयार करण्यात आला. मात्र त्याची एक बाजू आठ दिवसातच जमिनीत शिरली. सध्या रस्त्यावर एका बाजूने फक्त खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी साचते. शिल्लक अर्ध्या रस्त्यावरून सध्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. दुचाकीस्वारांना तर या मार्गाने जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या रस्त्यावरून प्रवास केल्यास पाठ, मान आणि कंबरेची हाडे खिळखिळी होत आहेत. नव्याने तयार केलेला रस्ता आठच दिवसात खराब झाल्यामुळे रस्ता बांधताना लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.

खड्ड्यांमुळे वाटेतच प्रसूतीचा धोका

श्रद्धानंदपेठकडून यशवंतनगर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरच महापालिकेचे रुग्णालय आहे. गोरगरीब नागरिकांसाठी ते महत्त्वाचे आरोग्य सुविधा केंद्र आहे. तेथे एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी आणले तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिची वाटेतच प्रसूती होण्याचा धोका आहे.

आणखी वाचा- आधीच जिल्हा चिंब, आता यलो अलर्ट; कोट्यवधीचे रस्ते, पिके गेलीत वाहून

आयुक्तांनी चालून दाखवावे

श्रद्धानंदपेठकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी एकदा प्रवास करावा. तरच त्यांना या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची जाणीव होईल, अशी भावना या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.