लोकसत्ता टीम
नागपूर: शहरातील विविध भागातील मैदाने खेळाडूंसाठी सोयी सुविधांसह चांगली करण्यात यावी, असे केंद्रीय मंत्र्यांचे आदेश असताना उत्तर नागपूरसह शहरातील विविध भागातील अनेक मैदानांची अवस्था खराब असून सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे खेळाडूंना खेळणे अडचणीचे झाले आहे. काही मैदाने तर दारूचे व जुगाराचे अड्डे झाल्याचे समोर आले आहे.
चांगले खेळाडू घडावे म्हणून जी काही मैदाने आहेत ती विकसित करण्याच्या दृष्टीने क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला आदेश दिले जातात. मात्र, प्रशासनाकडून त्याची मात्र फारशी दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. उत्तर नागपुरातील पंचवटी नगर मैदान, आनंद नगर मैदान, किनखेडे लेआऊट येथील आणि वैशाली नगर मैदानाची अवस्था फारच खराब झाली आहे. शहरात तीनशे मैदान तयार करण्याची तयारी खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने दर्शवली असताना अनेक मैदानांकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मैदानातील स्वच्छता गृहांचे दरवाजे तुटले आहेत. खेळाडूंसाठी कपडे बदलवण्यासाठी असलेल्या खोलीचेही दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहे.
हेही वाचा… नागपूर : आईसमोरच मुलीला ट्रकने चिरडले
पंचवटी नगरातील मैदान रात्री जुगार आणि दारूचा अड्डा झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. पूर्व नागपुरातील अनेक मैदानाला कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे सकाळच्यावेळी जनावरांचा वावर दिसतो. धरमपेठ झोनअंतर्गत रामनगर परिसरात महापालिकेचे मोठे मैदान आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या मैदानाची भकास अवस्था आहे. मैदानाच्या सभोवताल संरक्षक भिंत बांधण्यात आली. परंतु, दोन्ही प्रवेशद्वार सताड उघडे राहत असल्याने रात्रीच्यावेळी येथे असामाजिक तत्त्वांचा वावर आहे. तेलंगखेडी मैदानावर प्रवेशद्वार नसल्याने येथील असामाजिक तत्त्वांचा परिसरातील महिलांचा मोठा त्रास आहे. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने व खेळांडूना खेळण्याच्या दृष्टीने सोयी सुविधा नाही. त्यामुळे खेळाडू कसे घडतील, असा प्रश्न आनंदनगर येथील नागरिकांनी उपस्थित केला.
हेही वाचा… अकोला : पंढरपूर यात्रेसाठी भक्तांच्या सेवेत लालपरी धावणार, अतिरिक्त बस गाड्यांचे नियोजन
शहरातील मैदान विकसित करण्यासाठी निधी आला असून टप्प्यप्प्प्याने सर्व मैदाने विकसित केली जात आहेत. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून त्यांच्या परिसरातील मैदानांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे.
उत्तर नागपुरातील खेळण्याच्या मैदानांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले असून खेळण्याच्या दृष्टीन सोयी सुविधा नाही. रात्री दारूच्या पार्ट्या होतात. मोठ्या प्रमाणात असामाजिक तत्त्वांचा वावर येथे असतो. पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. – संजय चावरे, माजी नगरसेवक