नागपूर : शहरातील भटक्या श्वानांबाबत महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी कडक धोरण अवलंबले होते. भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यावर निर्बंध आणले होते आणि त्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र, गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात रस्त्यांवर आणि मैदानात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असल्याचे चित्र असून महापालिकेची कारवाई मात्र थंडावली आहे.
शहरात बहुतांश मोहल्ल्यात श्वानांची समस्या अजूनही कायम असून भटक्या श्वानांमुळे शहरातील अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये रात्री घरी परतणाऱ्या नागरिकांच्या मागे लागून हे श्वान त्यांना सळो की पळो करून सोडतात. शिवाय शहरातील विविध भागातील मैदानात सकाळी अनेक लोक फिरत असतात किंवा खेळत असतात. मात्र, तिथे श्वानांचा वावर वाढला आहे. रेशीमबाग मैदानावर मोठ्या प्रमाणात लोक खेळत असताना मैदानात मध्येच श्वान बसलेले असतात. श्वानांना मैदानातून हाकलल्यानंतर ते परत येतात. नागरिकांनी शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा यासाठी तक्रारी केल्या आहेत. महापालिकेचा आरोग्य विभाग काही प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठेच तशी यंत्रणा दिसून येत नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा >>> हिंदूंना फसवणाऱ्यांचे समर्थन करणार का?, गृहमंत्री फडणवीसांना अंनिसचा थेट सवाल
पाळीव श्वानांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण
शहरातील अनेक भागात पाळीव श्वानांनी भरवस्तीच्या ठिकाणी घाण केली तरी त्यांच्यावरील कारवाई थांबली आहे. शहरात ज्यांच्याकडे पाळीव श्वान आहे, अशा श्वान मालकांनी महापालिकेत नोंदणी करणे आवश्यक होते. तसे आदेश महापालिकेने काढले होते. मात्र, केवळ १३०० लोकांनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली.
भटक्या श्वानांना पकडणे सुरू असून नसबंदी व लसीकरण केले जात आहे. कारवाई थांबलेली नाही. भटक्या श्वानांना सार्वजानिक ठिकाणी खाऊ घालण्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात भांडेवाडी शेल्टरमध्ये व्यवस्था करण्यात आली. मात्र, तिथे फार दिवस श्वानांना बंदीस्त करता येत नाही.