नागपूर: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील नामवंत बँक आहे. येथे देशातील कोट्यवधी लोकांचे खाते आहेत. अनेक नागरिकांचे पेन्शन खातेही या बँकेत आहेत. सध्या बँकेने ऑनलाईन सुविधा, मोबाईल ॲप तयार केल्या आहेत. त्याचाही लाभ अनेक नागरिक घेत आहेत. परंतु, बँकेची हीच ऑनलाईन ॲप सुविधा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे बँकेचे कोट्यवधी खातेदार दुखावले आहेत. बँकेने असाकाही नियम काढला की सर्व ग्राहकांना बँकेच्या ऑनलाईन वापरासाठी नवीन मोबाईल घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे कोट्यवधी नागरिक त्रस्त असून रोज बँकेकडे तक्रार करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. काय आहे बँकेचा नवीन नियम पाहूया.
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने त्यांच्या यूनो ॲपच्या वापराबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. वाढत्या सायबर धोक्यांमुळे सुरक्षा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून एसबीआयने जुने स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बँकेने म्हटले आहे की ॲन्ड्रॉइड ११ किंवा त्यापूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवरील यूनो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ॲपचा अखंड प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांना नवीन मोबाइल डिव्हाइसवर अपग्रेड करण्याचे आवाहन केले जात आहे.
एसबीआयने वापरकर्त्यांना संदेशांद्वारे हा बदल कळवला आहे, ज्यामध्ये त्यांचे डिव्हाइस ॲन्ड्रॉइड १२ किंवा त्यापूर्वीच्या आवृत्तीवर अपग्रेड करण्यासाठी २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. या तारखेपर्यंत ॲन्ड्रॉइड ११ किंवा त्यापूर्वीचे स्मार्टफोन वापरणारे ग्राहक यूनो सेवा वापरू शकले. तथापि, १ मार्चपासून यूनो सेवा या जुन्या डिव्हाइसवर कार्य करणार नाहीत. एसबीआयने व्यत्यय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्वरित कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. सुशिक्षित ज्येष्ठ नागरिक हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनो ॲपचा वापर करतात. यामुळे त्यांना घरबसल्या आर्थिक व्यवहार करता येतात. परंतु, बँकेने नवाच नियम काढल्याने ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बँकेच्या एका ॲपसाठी नवा मोबाईल घ्यावा लागणार असल्याने सर्वांना प्रचंड त्रास होत आहे.