वर्धा : सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांची कमी नाही. मात्र कधी कधी हा प्रकार विकृत वळणावर जात असल्याचे पाहायला मिळाले. सेलू येथील घडलेला प्रकार असाच. नेहमी प्रमाणे आठवडी बाजार करीत असताना एक महिला खरेदी करीत होती. त्यावेळी एका आंबटशौकीन विकृत व्यक्तीने महिलेच्या जवळ जात तिच्या पाठीवर थाप मारली. तसेच लगट करण्याचा प्रयत्न केला. धक्का बसलेल्या त्या महिलेने मग संतापून त्या विकृत व्यक्तीच्या थोबाडीत हाणली.
हा प्रकार गर्दी असल्याने चर्चेत आला. नागरिकांची गर्दी झाली. झाला प्रकार समजताच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी मग संतप्त होत त्या व्यक्तीस चांगलेच बदडले. ज्याने-त्याने हात धुवून घेत त्यास पोलिसांच्या हवाली केले.
हेही वाचा – वर्धा : रोटरीची व्यापार खेळी अन् कचरा बसला खेळाडूंच्या गळी, मैदान झाले डम्पिंग ग्राउंड
यापूर्वीही आरोपीने याच महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याची बाब पुढे आली आहे. तिच्या मोबाईलवर पण संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे समजून आल्यावर त्यावेळीसुद्धा त्यास चोप बसला होता. हा व्यक्ती गावात असभ्य वर्तन करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. महिलांचा तो पाठलाग करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
सेलू पोलिसांनी आता त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो आढळून आलेत. पोलीस निरीक्षक तिरुपती राणे हे आता या विकृत आरोपीस कसे हाताळतात याकडे नागरिक व महिलांचे लक्ष लागले आहे. या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.