लोकसत्ता टीम
नागपूर : भरदुपारी चोरी करण्यासाठी दोन चोर घरात घुसले. त्यांनी घरात चोरी केली आणि पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेजाऱ्यांना चोर दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. दोन्ही चोरांनी पहिल्या माळ्यावरून उड्या घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तीतील नागरिकांनी त्यांना पकडले. हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस चक्क दोन तासांनी पोहचले. त्यामुळे प्रतिसादाची विक्रमी वेळ नोंदविण्याचा नागपूर पोलिसांचा दावा मात्र सपशेल फोल ठरला आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल गायकवाड (२४) रा. कैकाडीनगर, विक्की उर्फ सायमन रामटेके (२४) रा. रामटेकेनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथिदार शुभमसह दोघे फरार आहेत. दोघेही अट्टल चोरटे असून नुकतेच ते कारागृहातून सुटून बाहेर आले आहे. त्यांना दारू व ड्रग्सचे व्यसना आहे. व्यसन भागविण्यासाठी ते भरदिवसाच चोरी करीत असल्याची त्यांनी कबुली दिल्याची माहिती आहे. या चोरट्यांनी हुडकेश्वर परिसरात टेहळणी केली. मेहरबाबानगर येथील रहिवासी फिर्यादी निलेश तांदुळकर (४०) हे कुटुंबियांसह समारंभासाठी गेले होते. ही संधी साधून चोरटे घरात घुसले. सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण एक लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला.
आणखी वाचा-‘मेडिकल’साठी दिलेले १.६० कोटी ‘एम्स’साठी वापरले, उच्च न्यायालय म्हणाले, आता परत द्या…
दरम्यान, शेजारच्यांना तांदूळकर यांच्या घरात कोणीतरी घुसल्याचा संशय आला. त्यामुळे शेजारी गोळा झाले. विशाल आणि विक्की हे दोघेही वरच्या माळ्यावरुन उड्या मारल्याने जखमी झाले. त्यांना नागरिकांनी पकडून ठेवले. हुडकेश्वर पोलिसांना फोन करुन माहिती दिली. मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठण्यासाठी चक्क दोन तास लावले. उशिर झाल्यामुळे एका जागृत नागरिकाने विचारणा केली असता पोलीस कर्मचारी हितेश कडू यांनी नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात रविवारी लेखी तक्रार करुन कारवाईची मागणी केली.
चोर पकडल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून दोन बीट मार्शल रवाना झाले होते. मात्र, रस्त्यात दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे दुसरे वाहन उपलब्ध होईपर्यंत त्यांनी वाट बघितली. त्यामुळे घटनास्थळावर पोहचण्यास उशिर झाला, अशी प्रतिक्रिया ठाणेदार कैलास देशमाने यांनी दिली.