लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अमरावती महामार्गावरील विद्यापीठ परिसर ते आरटीओ दरम्यान उड्डाणपुलाचे काम आणि महापालिकेतर्फे अग्रसेन रोड, गिरीपेठ येथील सिमेंट रस्त्याचे काम एकाचवेळी हाती घेण्यात आले. त्यासाठी अमरावती मार्गावरील आणि अग्रेसन मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे गिरीपेठ, गोरेपेठ, धरमपेठ, म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सीताबर्डी, सिव्हिल लाईन्सकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अमरावतीकडे जाणाऱ्यांसाठी थेट मार्ग उपलब्ध करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोन उड्डाणपूल उभारत आहे. त्यापैकी वाडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे तर विद्यापीठ ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या २.८८ किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा पूल आरटीओजवळ संपवतो. या कामासाठी अमरावती मार्गावरून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयाजवळ म्हाडा कॉलनी आहे. येथील रहिवाशांना अमरावती मार्गावर, धरमपेठ, गोकुळपेठकडे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यात पुन्हा सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे.

अमरावती मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक आधीच एकेरी करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असतानाच आता शेजारील आदिवासी भवनसमोरून जाणाऱ्या धरमपेठ मार्गाचे (अग्रसेन मार्ग) सिमेंटचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गिरीपेठ, म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी बाहेर पडायचे कसे, असा प्रश्न आहे. आरटीओ कार्यालयात आणि आदिवासी विकास विभाग कार्यालयात ये-जा करण्यात अडचणींना सामोर जावे लागत आहे. एकाचवेळी दोन कामे सुरू करून रस्ते बंद करण्याच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

Story img Loader