अकोला शहरातील एका भागामध्ये भाड्याच्या घरात बाहेर जिल्ह्यातील चार महिला गेल्या काही दिवसांपासून राहात आहेत.त्या ठिकाणी अवैध देह व्यापार चालवला जात असल्याच्या संशयावरून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.मात्र, भलतेच वास्तव समोर आले. चार महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
शहरातील वाशीम बायपास भागातील गंगा नगर परिसरामध्ये एक घर भाड्याने देण्यासाठी मालकाने दलालाकडे दिले होते. त्या दलालाने चार महिला त्या भाड्याच्या घरात आणून ठेवल्या. त्या महिलांच्या हालचाली व वागण्यावरून स्थानिकांना संशय आला. त्या घरांमध्ये देह व्यापार चालवला जात असल्याच्या अंदाजावरून स्थानिक महिलांनी घरावर धडक दिली.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयित चार महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावर पोलिसांनी पडताळणी केली. त्या घरामध्ये ४० ते ४५ वयोगटातील चार महिला आढळून आल्या. स्थानिक नागरिकांनी देह व्यापाराचा गंभीर आरोप केला.
मात्र, स्थानिक नागरिकांच्या संशयानुसार कोणतेही ठोस पुरावे त्या घरात आढळून आले नाहीत. पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. महिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ११० आणि ११७ नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. घरमालकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते.संशयित महिला इतर जिल्ह्यातून अकोला शहरात आल्या आहेत. कुठल्या कारणाने त्या महिलांनी अकोला शहर गाठले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. याचा तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.
घर भाड्याने देतांना सतर्क राहण्याची गरज
गुंतवणूक म्हणून घेतलेले घर अनेक वेळा भाड्याने देऊन त्यापासून उत्पन्न मिळवले जाते. घर भाड्याने देतांना मालकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे अकोल्यात घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होते. गंगा नगर परिसरामध्ये एक घर भाड्याने देण्यासाठी मालकाने दलालाकडे दिले. मात्र, त्याचा परस्पर गैरवापर केला जात होता. स्थानिक नागरिकांच्या जागृतेमुळे हा प्रकार समोर आला. घर भाड्याने देतांना मालकांनी संबंधित भाडेकरूची संपूर्ण चौकशी करावी, नंतरच घर भाड्याने द्यावे, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.