लोकसत्ता टीम
यवतमाळ : जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. अशा थंडीत भल्यापहाटे थंड पाण्याने आंघोळ करणे कसे जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय घाटंजी येथे आला.
घाटंजी येथील संभाशिव वहिले (६२) हे शहरानजीक वाघाडी नदीवर शुक्रवारी सकाळी आंघोळीस गेले. सकाळी सकाळी थंड पाण्यात उतरल्याने ते थंडीने गारठले व बेशुद्ध झाले. नदी काठावरील काही नागरिकांना ते पाण्यावर तरंगताना दिसले. त्यामुळे नागरिकांनी घाटंजी पोलिसांना माहिती दिली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत ठाणेदार निलेश सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. संभाशिव यांना नदीपात्रातून बाहेर काढल्यावर पोलिसांनी त्यांची नाडी तपासली असता ते जिवंत असल्याची खात्री पटली. पोलिसांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सध्या या वृद्धाची प्रकृती स्थिर आहे.
आणखी वाचा-भंडारा : आईचे हाल पाहवेना… सुपारी देऊन मोठ्या भावानेच लहान भावाला संपवले
थंड पाण्यामुळे या वृद्धास अटॅक आल्याचे सांगण्यात आले. यात शरीराच्या नसा मोठ्या होऊन हृदयाचे ठोके कमी होतात आणि मेंदूकडे रक्त पुरवठा कमी होतो. त्यामुळे व्यक्ती आपली शुद्ध हरवून बसतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. जागरूक नागरिकांनी वेळेवर पोलिसांना फोन करणे, पोलिसांनी तत्परतेने येऊन नदी पात्रातून या वृद्धास बाहेर काढून योग्य औषधोपचार मिळाल्याने या वृद्धाचे प्राण वाचले.