नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुण्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम तेथील महापालिका राबवत आहे, मात्र नागपुरात अंबाझरी तलावाजवळ अनधिकृतपणे पुतळा बांधलेला आहे व पुरासाठी कारणीभूत ठरलेला आहे व तो का तोडला जात नाही, असा सवाल नागपूरमधील अंबाझरी ले्आऊट परिसरातील नागरिकांनी केला आहे.
सप्टेबर २०२३ मध्ये अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आलेल्या पुरामुळे परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तलावातून बाहेर पडलेले पाणी परिसरातील पुतळ्याच्या बांधकामाला अडकले तेथून ते वस्त्यांमधून शिरले होते. त्यामुळे पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी पूरबाधित वस्त्यांमधील नागरिकांनी केली आहे. महापालिकेने पूर्वी या पुतळ्याची बांधणी अधिकृत नाही,असे सांगितले व नंतर यावर यू टर्न घेत चुकीने ही माहिती दिल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. यावरून पुतळा कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले आहे, याकडे पूरबाधित वस्तीतील नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा >>>महावितरणच्या घोषणेनंतरही स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन कायम… वीज ग्राहक संघटना म्हणते…
अंबाझरी परिसरातील रहिवासी यशवंत खोरगडे म्हणाले, तलावालगत स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारणी हा नियमांचाच भंग आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांती अवैध पब्स व बार वर बुलढोझर चालवा, असे आदेश पुणे महापालिकेला दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. अंबाझरी तलावालगतचा पुतळा हा नियमात बसणारा नाही, मग तो हटवला का जात नाही. पुतळा इतरत्र हलविता येऊ शकतो. हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता पाण्याच्या प्रवाह सुरळीत होण्याच्या मार्गातील अडथळा आहे हे मान्य करून तो स्थलांतरित करावा,अशी मागणी आहे.
हेही वाचा >>>नागपुरातील लिनियर एक्सिलेटर अडकले डॉलर- रुपयांच्या वादात; कर्करुग्णांचे हाल
उपाययोजनांवर नाराजी
तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर त्यातून बाहेर पडणारे पाणी कशा पद्धतीने पुढे जावे यासाठी तांत्रिकदृष्ट्या विचार करून आराखडा तयार केला जातो. पावसाची व पुराची तीव्रता लक्षात घेऊन आराखडा तयार केला जातो. अंबाझरी धरणातून प्रती सेकंद ३२० घन मीटर पाण्याचा विसर्ग होईल हे लक्षात घेऊन जागा निश्चित केली आहे. पाण्याचा वेग (वेलॉसिटी) ६ मीटर प्रती सेकंद असेल तर पाणीवहन करण्यासाठी ६० चौरस मीटर जागा लागते. सध्या तलावाच्या पुढील पुल रुंद करण्याचे काम सुरू आहे. जुना पूल ६३ चौरस मीटर जागेत आहे. तो १७ मीटर बाय ३.५ मीटर करणार आहेत. ही सगळी तांत्रिक गरज आहे. तर मग स्मारकाच्या बाजूंचेजे २ चॅनल कमीतकमी ६० चौरस मीटर असायला हवे. पण त्याची क्षमता दोन्ही मिळून ३० चौरस मीटर सुद्धा नाही. त्यामुळे पूर आला तरी पाणी पुलापर्यंत पोहचेल कसे, असा सवाल खोरगडे यांनी केला आहे.