गोंदिया : गोंदिया शहरा जवळील आशीर्वाद कॉलनीतील काही नागरिकांनी वस्तीतील ४ ते ५ कुत्र्यांना पकडले व त्यांचे पाय व तोंड बांधून पोत्यात टाकून एका पिकअप वाहनमध्ये टाकून जंगलात सोडून दिले.शहरातील श्वानप्रेमी सामाजिक संघटनेच्या काही लोकांना याची माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून विरोध केला. आणि स्वयंसेवी संस्थेने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. ग्रामीण पोलिसांनी ही आशीर्वाद कॉलोनीत जाऊन पाहणी केली, पण तक्रार नोंदवली नाही आणि कोणतीही अटक केली. या प्रकरणामुळे शहरातील प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निरपराध प्राण्यांवर होणारे क्रौर्य रोखण्यासाठी या देशात अनेक कायदे अस्तित्वात आहेत, पण त्या कायद्यांतर्गत कारवाई का होत नाही हे गूढच आहे.
लोकांमध्ये झाला वाद
गोदिया शहरातील समाज माध्यमावर एक चित्रफित प्रसारित झाली आहे, ज्यामध्ये काही लोक अत्यंत क्रूरपणे मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे पाय बांधून पोत्यात भरताना दिसत आहेत. व्हिडिओनुसार, हे प्रकरण शहरातील आशीर्वाद कॉलनीचे आहे. या कुत्र्यांना जेरबंद करताना त्यांना ज्या पद्धतीने क्रूर वागणूक दिली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.ही चित्रफिती शहरात चर्चेचा विषय झाली आहे. या चित्रफितीमध्ये श्वान पकडणारे आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद होताना दिसत आहे.
हेही वाचा…महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.
गोंदिया नगर परिषदेने कुणालाही काम दिले नाही
गोंदिया नगरपरिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम सुरू केली होती, त्यात २००० हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते.गोंदिया शहरातील समाज माध्यमावर ही चित्रफित प्रसारित झाल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांच्याकडून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सध्या नगर परिषदे कडून शहरात अशी कोणतीही मोहीम राबविली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोकाट कुत्र्यांना क्रूर वागणूक देऊन कोणी पकडत असेल, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. सध्या नगर परिषदेने असे कुत्रे पकडण्यासाठी कुणालाही अधिकृत केलेले नाही. मात्र भविष्यात अशी मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी बोलताना दिली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे पण अद्याप नोंद केली नाही ,अशी माहिती गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक काळे यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.