चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे नेते मतदान यंत्र, वाढीव मतदान आणि पैसेवाटपाचे आरोप करून मोकळे झाले. आता नागरिकांनीच या पराभवामागील कारणे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिली आहेत. काँग्रेस पक्ष व नेत्यांचे चुकत आहे, विजयासाठी ठोस रणनीती आखा, अशा शब्दात नागरिकांनी काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावले. हे ऐकून काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि खासदारांसह सर्वच नेते अवाक झाले होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी प्रभाग बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पहिलीच प्रभाग बैठक माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्या निवासस्थानी शनिवारी पार पडली. या बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, शहराध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, प्रवीण पडवेकर, आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे उपस्थित नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
लेखक, कवी, नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे कुठेतरी चुकत आहे, यातून बोध घ्यावा, असे त्यांनी सुचवले. विनोद दुर्गपुरोहित यांनी, कधीकाळी इंदिरा गांधी यांनी देशावर राज्य केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र, मोदींसमोर काँग्रेसकडे सक्षम पर्याय नसल्याचे सांगितले. यामुळे लाडकी बहीण योजना, मतदान यंत्र, वाढीव मतदान आणि पैसेवाटप, ही कारणे देण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक पक्ष लोकांसाठी प्रलोभनरूपी योजना आणतात. काँग्रेसनेही अशा योजना आणल्या. मात्र, भाजपच्या योजनांनी लोकांना आकर्षित केले, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने संघटन तसेच काम करण्याच्या पद्धतीत बदल करावा, अशी सूचनाही दुर्गपुरोहित यांनी केली.
आम्ही काँग्रेस विचारधारेलाच मानणारे आहोत. मात्र, मागील काही वर्षांत काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला आहे. पक्षाची घडी नीट बसवावी लागेल, असे श्याम धाेपटे यांनी सांगितले. आज काँग्रेसची राजकीय ताकद कमी झाली असून भाजपची वाढली आहे. काँग्रेसला आपली ताकद वाढवायची असेल तर विविध पातळ्यांवर काम करावे लागेल, अशी सूचना अनेक नागरिकांनी केली. चुका सुधारून नव्याने रणनीती आखल्यास काँग्रेसला यश नक्कीच मिळेल, असा आशावाद अनेकांनी बोलून दाखवला. केवळ दोष देऊन चालणार नाही, तर नेत्यांनी स्वत:च्या विजयापेक्षा पक्षाच्या विजयाला महत्त्व द्यावे, अशी गरज अनेकांनी व्यक्त केली.
नेत्यांमधील गटबाजी दूर करा
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गटबाजी विसरून काम करावे, तरच महापालिका निवडणुकीत यश मिळेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विश्रामगृहावरील बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. त्यानुसार, महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले शहराध्यक्ष रामू तिवारी व नंदू नागरकर या आढावा बैठकीत एकत्र आले. मात्र, खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील मतभेद अद्यापही कायम आहेत. विधानसभा निवडणुकीतील एक प्रचारसभा वगळता हे दोन्ही नेते अद्यापही एका मंचावर आलेले नहीत. त्यामुळे सर्वप्रथम नेत्यांनी गटबाजी दूर करावी, मग पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असा खोचक सल्ला स्वत: काँग्रेस कार्यकर्ते नेत्यांना देत आहेत.