विदेशी रुग्ण वाढल्यास रोजगार, विदेशी चलन वाढणार
शहरात मेडिकल व मेयो या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसह दंत, आयुर्वेद व इतरही शासकीय व खाजगी संस्था आहेत, परंतु त्यानंतरही वैद्यकीय संशोधनावर शहरात फारसे काही होतांना दिसत नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास वैद्यकीय संशोधनाचे हब म्हणून करण्याची गरज असून त्याने शहराची आरोग्यसेवाही आंतराष्ट्रीय दर्जाची होईल. अद्यावत उपचार उपलब्ध झाल्यावर विदेशी रुग्ण वाढल्यास नवीन रोजगारनिर्मिती होऊन देशाला मोठय़ा प्रमाणावर विदेशी चलनही प्राप्त होईल.
राज्यात केवळ नागपूरलाच मेडिकल व मेयो या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय या सरकारी संस्था आहेत. शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात असून येथे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयासह इतरही काही शासकीय व खाजगी महत्वाच्या संस्था आहेत. शहरात केंद्र व राज्य शासनाकडून घोषणा झाल्यामुळे लवकरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) सुरू होणार असून त्याचेही प्रशासकीय काम विविध विभागांतर्गत सुरू आहे. शहरात भविष्यात कॅन्सर, पॅरामेडिकल, नेत्र, आयुर्वेद, होमियोपॅथी, आयुर्वेद, न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या संस्थांसह इतरही अनेक महत्वाच्या संस्था प्रस्तावित आहेत. या संस्था स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू झाल्यास नागपूरला मोठय़ा प्रमाणावर नवनवीन संशोधन होण्यास मदत मिळेल. त्यातच शहरातील मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद या चारही वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या हव्या त्या प्रमाणावर संशोधन होत नाही. हे चित्र बदलण्याकरिता शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांकडून यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रत्येक वर्षी निधी अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात येतो, परंतु त्याची उचल या संस्थांकडून होतांना दिसत नाही. त्यामुळे या संस्थांमधील प्रत्येक शिक्षकासह विद्यार्थ्यांकडून संशोधनाला प्राधान्य मिळावे म्हणून शासकीय स्तरावरून काही सक्तीही गरजेची आहे.
शहरात असे संशोधन वाढल्यास त्याच्याशी संबंधित विविध संस्था व उद्योगही येथे वाढण्यास मदत होईल. या संस्था वाढल्यास शहरातील रुग्णांकरिता आंतरराष्ट्रीय स्तराच्या आरोग्य सुविधा शहरातच उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबईसह विदेशात जावे लागणार नाही. सोबतच, हल्लीची स्थिती बघितली तर भारतात विदेशाच्या तुलनेत स्वस्त दरात खाजगी उपचार उपलब्ध आहे. तेव्हा बरेच रुग्ण विदेशातून नागपूरसह देशात उपचारासाठी येतात. नागपूरला वैद्यकीय संशोधन हब झाल्यास विदेशी रुग्णांची संख्या वाढून येथे रोजगारासह विदेशी चलनही देशात वाढण्यास मदत होईल.
वैद्यकीय संशोधन संस्थांमुळे रुग्णांना होणारे लाभ
*जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा शहरात मिळणार
*वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार
*तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास होणार मदत
*असाध्य आजारांवर उपचार उपलब्ध होण्याची आशा
*शासकीय संस्थांत रुग्णांना कमी दरात अद्यावत उपचार
*वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा