चंद्रपूर : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य लढ्यात युवा स्वयंसेवक बालाजी रायपुरकर शहीद झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘आरएसएस ॲन्ड फ्रिडम स्ट्रगल’ या पत्रकात केला आहे. सध्या हे पत्रक समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यालाच विरोध होता, हा इतिहास आहे. चिमूरची क्रांती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ऊत्स्फुर्त आणि जाज्वल विचारांनी झाली. संघाचा हा दावा म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजदेखील संघाचे होते, असा त्याचा अर्थ होईल, अशी टीका माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने चिमूर स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग तथा स्वयंसेवक बालाजी रायपुरकर शहीद झाल्याचा दावा ‘आरएसएस ॲन्ड फ्रिडम स्ट्रगल’ या पत्रकात करताच समाज माध्यमावर या दाव्याबद्दल वादप्रतिवाद सुरू झाले आहेत. चिमूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबद्दल मत व्यक्त केले. चिमूरचा स्वातंत्र्य लढा हा काँग्रेस विचारसरणी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी झाला. चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. संघाने हा दावा केला असला तरी त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यालाच विरोध होता, हा इतिहास आहे. त्यावेळी त्यांची भावना, भूमिका वेगळी होती, त्यावेळी हिंदू राष्ट्र संकल्पना ही संघाची होती. देश स्वातंत्र्य झाला तर त्यांचे महत्त्व, प्राबल्य कमी होईल, या भीतीपोटी त्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला होता. चिमूर क्रांती देशभक्तीच्या भावनेतून झाली. भारत-पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर चीनच्या सिमेवर जाऊन राष्ट्रसंतांनी सैनिकांना स्फूर्ती दिली होती. संत सिमेवर जाऊन स्फूर्ती देण्याचे काम करीत नाहीत, मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे काम. आता संघ, १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य लढ्यात युवा स्वयंसेवक बालाजी रायपुरकर शहीद झाल्याचा दावा करीत आहे. मग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही संघाचे होते, असा या दाव्याचा अर्थ होईल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.