बुलडाणा : एक लाख रुपये द्या अन् त्याबदल्यात पाच लाख रुपयाच्या बनावट नोटा घेऊन जा, असा दावा इन्स्टाग्रामवरून करण्यात आल्याने आणि यावर कळस म्हणजे हे आव्हान करणाऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातील पत्ता दिल्याने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
पाच जानेवारी रोजी दुपारी ही धक्कादायक बाब किंबहुना नेटकरी आणि पोलिसांना चक्रावून टाकणारा घटनाक्रम समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर ‘अंडरस्कोअर शिव अंडरस्कोअर तांडव, अंडरस्कोअर ९९’ या अकाउंटवरून चेक इन करन्सीच्या नावाखाली एक लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपयाच्या बनावट नोटा देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी मोबाइल क्रमांकदेखील देण्यात आला. तसेच क्लीप तयार करणाऱ्याने आपला पत्ता धामणगाव, बुलढाणा जिल्हा, मलकापूर रेल्वे स्टेशन, असा नमूद केला. त्यामुळे बनावट नोटांचे कनेक्शन मलकापूरशी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
हेही वाचा…बहिरम यात्रेत ‘बैलगाडा शर्यती’सोबतच राजकीय चढाओढ…
विशेष म्हणजे, हा दावा करणाऱ्याने आपला मोबाइल क्रमांकदेखील दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या/e क्लीपमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या संदर्भात दखल घेतल्याचे सांगितले. आपल्या काही टीम यावर काम करत आहेत, बनावट नोटांचा रॅकेट उघड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी.
मलकापूर येथे जप्त करण्यात आली होती नोटा छापण्याची मशीन
काही महिन्यांपूर्वीच मलकापूर येथे बनावट नोटा छापाण्याची मशीन पोलिसांनी जप्त केली होती. या मशीनची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता सदर व्हिडीओ समोर आल्याने बनावट नोटांचे मोठे रॅकेट जिल्हयात सक्रिय असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.