अकोला : दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पहिला पेपर सोडवतांना चक्क रील बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला. समाज माध्यमावर ती चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. परीक्षा केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असतांना नियमबाह्यरित्या परीक्षा केंद्रावर चित्रीकरण करण्यात आल्या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली. व्हिडिओमध्ये छेडछाड करून दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून त्या चित्रफितीतील वर्ग खोल्या परीक्षा केंद्राच्या नाहीत, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात केंद्राधिकाऱ्याकडून अहवाल प्राप्त होताच सायबर क्राईमकडे माहिती दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोल्यातील एका प्रकारामुळे दहावीच्या परीक्षेतील व्यवस्था व सुरक्षेतील भोंगळपणा चव्हाट्यावर आला. शहरातील अग्रेसन चौकामध्ये सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आहे. या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी एका युवकाने चक्क रील बनवली. केंद्राच्या फाटकापासून संपूर्ण केंद्राचे चित्रीकरण करण्यात आले. धक्कादायक म्हणजे परीक्षार्थी उत्तरपत्रिका लिहित असल्याचे देखील चित्रफितीमध्ये दिसत आहे. त्याची चित्रफित चक्क ‘इंन्स्टाग्राम’वर शेयर केली आहे. ती रील समाजमाध्यमात चांगलीच प्रसारित झाली. परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बोथ चालू ठेवण्यास निर्बंध आहेत. त्यासोबत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल आदी वस्तू घेऊन जाण्यावर बंदी आहे. तरीही देखील तरुणाने मोबाईल परीक्षा केंद्रात नेऊन केंद्राचे चित्रीकरण केले. 

चौकशी सुरू; करवाई संदर्भात चाचपणी या प्रकरणाची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्राधिकाऱ्यांकडून तत्काळ मागविण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली. सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेची इमारत ब्रिटिशकालीन असून चित्रफितीमध्ये दाखवलेल्या वर्गखोल्या परीक्षा केंद्राच्या नाहीत. त्या चित्रफितीत केवळ परीक्षा केंद्रातील बाहेरचा भाग दाखविण्यात आला. इतरचा भाग त्याला जोडून दिशाभूल करण्याचा तो प्रकार आहे, असे ही त्यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती परीक्षा मंडळाला देखील देण्यात आली. या प्रकरणासंदर्भात अहवाल प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून कारवाईची पुढील प्रक्रिया केली जाईल, असे डॉ. पाटेकर यांनी स्पष्ट केले.