लोकसत्ता टीम
भंडारा : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी आणि चालक एकमेकांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ साकोली आगारातला असून आगारात बस चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये मारामारी झाली झाल्याचे समोर आले आहे. बस फेरीवरील चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरुन हा वाद झाला आहे. हाच वाद पुढे टोकाला गेला अन् त्यांच्यात मारामारी झाली. भंडाऱ्यातील साकोली एसटी आगारात हा प्रकार घडला असून चालकाच्या आणि अधिकाऱ्याच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत एसटी आगारात अनेक कर्मचारी दिसत आहे. चालक आणि एसटी अधिकारी एकमेकांच्या छातीवर बसून मारामारी करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना जबरदस्त मारहाण करताना दिसत आहे. त्या दोघांनीही इतर कर्मचारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत असून त्यानंतर दोघांनी समजावून बाजूबाजूला घेऊन जाताना दिसत आहे.
साकोली एसटी आगारातील हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. पंकज काटनकर असे चालकाचे नाव आहे. तसेच प्रदीप करंजेकर असे एसटी अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्या दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर त्यांचे भांडण वाढले आणि त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळचा आहे.
© The Indian Express (P) Ltd