नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्षाच्या अधिकारालाच आव्हान दिले, तर नाना पटोले यांनी उत्तर देण्याइतपत वडेट्टीवार मोठे नेते नसल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या या दोन नेत्यांमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कोणत्याही निवडणुकीत भाजपाशी युती करायची नाही. तसेच त्या पक्षाला फायदा होईल ही कृती करायची नाही, असे काही घडल्यास संबंधाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश दिले होते. तरीदेखील पक्षादेश झुगारून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंनी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवतळे हे वडेट्टीवार यांचे समर्थक आहे आणि त्यांनी भाजपाशी हातमिळवणी त्यांच्या सहमतीने केली हे उघड आहे. आपल्या समर्थकांची अशाप्रकारे हकालपट्टी करण्यात आल्याने वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय त्यांनी प्रदेशाध्यक्षांना अशाप्रकारे जिल्हाध्यक्षांना कार्यमुक्त करण्याचे अधिकार आहेत काय, हे तपासावे लागले, असे विधान केले.
एवढेच नव्हेतर राज्यात २२ ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाशी युक्ती करण्यात आली. मग त्यांच्यावरही कारवाई करण्यात यायला हवी, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देताना या विषयावर बंदद्वार चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच वड्डेटीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी, एवढे ते मोठे नेते नाहीत, असा टोला पटोले यांनी लगावला.