नागपूर : औरंगजेबाच्या कबरीवरुन सोमवारी रात्री उपराजधानी अक्षरश: पेटली. कित्येक तास चाललेला दोन गटातील संघर्ष वाहने फोडण्यापासून तर दगडफेकीपर्यंत सुरूच होता. यात कित्येकजण जखमी झाले, पण हा संघर्ष थांबता थांबत नव्हता. जमावाला आवरताना पोलिसांचीही दमछाक झाली आणि त्यांनाही गंभीर जखमा झाल्या. तरीही वेदना सहन करत ते कर्तव्य बजावत होते. मात्र, त्यांच्या या वेदनेवर फुंकर घातली ती डॉ. हर्षा वैद्य यांनी. एवढ्या दंगलीच्या परिस्थितीतही त्या जखमींना आरोग्य सेवा देत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना जबर मार बसला. यात प्रामुख्याने पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले. नागपूर पोलिसांचे चार डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते.

जमावातील अज्ञात व्यक्तीने कदम यांच्यावर हल्ला गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली. त्यानाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला. तर काहींना दगडांचा मुकामार बसला. ज्यांना कुठलीही मोठी जखम झाली नाही तसे अनेक पोलीस सध्याही वेदना सहन करत कर्तव्यावर हजर आहेत. अशाच वेदना सहन करूनही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना महाल परिसरातील डॉ. हर्षा वैद्य आरोग्य सेवा देत आहेत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुका मार लागला आहे, दगडांचा लोखंडी वस्तूंचा मार बसला आहे, अशा पोलिसांना डॉ. वैद्य आवश्यक गोळ्या आणि टीटनेसचे इंजेक्शन देत आहेत. संचारबंदीमुळे आज बहुतांशी औषधांची दुकाने बंद आहेत, त्यामुळे डॉक्टर वैद्य यांची सेवा पोलिसांसाठी अत्यंत मोलाची ठरत आहे.