दक्षिण गडचिरोली परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. अहेरी तालुक्यातील दामरंचा गावापलीकडे छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते.
त्या परिसरात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन नक्षलवादी ठार झाले.
हेही वाचा: कोवळ्या बछड्याचा मृतदेह बघून गुरगुरली वाघीण!; मातेचा संताप बघून अधिकारीही परतले
दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. तिच्याकडून एक बंदूक ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे एक दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या भागात नक्षल्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याबाबत वृत्त दिले होते.