बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील एका धार्मीक स्थळासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. रामनवमी उत्सवाला गालबोट लावणारी ही दुर्दैवी घटना २९ मार्च रोजी रात्री उशिरा मोताळा येथे घडली. बोराखेडी पोलिसांनी दोन्ही गटातील ३८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
मोताळा येथील एका धार्मिक स्थळासमोर २९ मार्च रोजी रात्री काही युवकांनी घोषणाबाजी केली. यावर विचारणा करण्यासाठी शेख रशीद आणि काही युवक गेले असता ज्ञानेश्वर राजू सपकाळ, सोपान सपकाळ, बाळू किरोचे, धनराज सोळंके, सुमीत विठ्ठल सोनुने, योगेश न्हावी, विठ्ठल तानाजी तायडे, गणेश तायडे, सचीन घडेकर, शिवा घडेकर यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी त्यांना मारहाण केली. यात चौघे जण जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात शेख अन्सार शेख युनीस यास जबर मार लागल्याने त्यास बुलढाणा व नंतर तेथून औरंगाबाद येथे हलवण्यात आले. याप्रकरणी शे. रशीद शे. खलील यांनी बोराखेडी पोलीसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी उपरोक्त दहा आणि इतर अज्ञात पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय विजयकुमार घुले हे करीत आहे.
दुसऱ्या गटातील विठ्ठल तानाजी तायडे यांनीही पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार २९ मार्च रोजी रात्री ख्वाजा नगर मध्ये शेखकलीम शेख युनूस, शेख अनसार शेख युनूस, शेख अरशद शेख बुडन, शेख रशीद शेख खलील, अरबाज खान कलीम खान आणी वसीम शाह छोटू शाह यांनी ‘येथे घोषणा का दिल्या’, असे विचारले. नंतर काठ्या, फळ कापण्याचे कटर आणी विटाने तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. त्यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सहा जण ताब्यात
अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन कदम, ठाणेदार बळीराम गीते यांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले. पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दोन्ही गटातील सहा जणांना ताब्यात घेतले.