नागपूर : गवंड्याच्या प्रेमात दहावीची विद्यार्थिनी पडली. त्यानेही तिला ओढून लग्नाचे आमिष दाखवले. घरी कुणी नसताना दोघांनीही पलायन करीत मंदिरात लग्न केले. मात्र, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. मुलीला आईवडिलांच्या स्वाधीन केले तर गवंड्याला पोलिसांनी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ वर्षीय पीडित मुलगी प्राजक्ता (बदलेले नाव) ही दहाविची विद्यार्थिनी आहे. ती मूळची मध्यप्रदेशातील बालाघाट शहरातील आहे. तिचे आईवडिल तीन वर्षांपूर्वी नागपुरात कामाच्या शोधात आले होते. ते वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्माणाधीन बहुमजली इमारतीवर बांधकाम मजूर म्हणून काम करीत होते. ती दिवाळीच्या सुटीत आईवडिलांकडे आली होती. तिला दोन बहिणी असून दोघीही विवाहित आहेत. प्राजक्ता ही बालाघाट येथील शाळेत शिकते. मात्र, आईवडिल मोलमजुरीसाठी नागपुरात राहत असल्यामुळे ती नेहमी नागपुरात ये-जा करीत होती. दिवाळीच्या सुटीत आली असता बांधकामावर मिस्त्री असलेल्या इंद्रराज हटबे (४५, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याशी तिची ओळख झाली. इंद्रराजच्या हाताखाली प्राजक्ताचे वडिल मजूर म्हणून काम करीत होते. त्यामुळे तो नेहमी प्राजक्ताच्या घरी येत होता. वडिलाचा मित्र असलेल्या इंद्रराजची नजर प्राजक्तावर पडली. त्याला ती आवडली आणि त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. तिच्याशी गोडगोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्राजक्तालाही इंद्रराज आवडायला लागला. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. प्राजक्ताचे वडिल घरी नसताना इंद्रराज हा घरी यायला लागला. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.

हेही वाचा…धक्कादायक! दुचाकीरून जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट; मुख्यध्यापकाचा मृत्यू

पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय

इंद्रराजला पत्नी व दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी प्राजक्ताच्या वयाची आहे. तरीही त्याने प्राजक्ताला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तीसुद्धा पळून जाऊन लग्न करण्यासाठी तयार झाली. २७ नोव्हेंबरला दोघांनीही रेल्वेने पळ काढला. तो थेट संगमनेर शहरात पळून गेले. तेेथे एका मित्राच्या घरी दोघेही राहायला लागले. तो तेथेच एका ठिकाणी कामावर लागला. प्राजक्तासुद्धा त्याच्यासोबत बांधकामावर मजूर म्हणून कामावर जायला लागली.

हेही वाचा…दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती, निर्णयास ग्राहक पंचायतीचा विरोध

पोलिसांनी घेतले दोघांचा शोध

प्राजक्ताच्या आईने वाठोडा पोलीस ठाण्यात मुलीला पळून नेल्याची तक्रार दिली. त्यामुळे अनैतिक मानवी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी प्राजक्ताचा शोध घेतला. दोघेही संगमनेरला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक संगमनेरला पोहचले. त्यांनी बांधकामावर काम करणाऱ्या प्राजक्ताला ताब्यात घेतले. त्यानंतर दारु पिऊन बांधकामावर पडून असलेल्या इंद्रराजला ताब्यात घेतले. दोघांनाही नागपुरात आणले. प्राजक्ताला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी बालाघाटला पाठविण्यात आले तर इंद्रराजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 10 student fell in love with mason both ran away and got married in temple adk 83 sud 02