नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने कॉपीमुक्त अभियानावर प्रश्न उपस्थित केला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका परीक्षा केंद्रावर बारावी भौतिकशास्त्राचा पेपर बाहेर आला असून सर्व प्रश्न उत्तरांची छायांकित प्रत बाहेर आली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे काॅपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

साेमवारी (दि.१७) बारावी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका केंद्रावर त्याच शाळेतील एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली छायांकित प्रत दिली. छायांकित कॉपीवर एकूण नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा व त्याची उत्तरे सोडवून छायांकित प्रत केंद्रावर आली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारात केंद्रावर अधिनस्त असलेले शिक्षक सामील तर नाहीत ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे शिक्षण विभागाचे भरारी पथक तसेच महसूल विभागाचे भरारी पथक हातावर हात धरून बसले असल्याचे चित्र देवरी शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे आता तरी शिक्षण विभागाने जागे होऊन सर्व केंद्रांवर धाडी टाकून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी महेंद्र माेटघरे व उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी एकाही केंद्रावर असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकारात कुठलेच तथ्य नसल्याचे सांगितले.

Story img Loader