नागपूर : वर्गमित्राने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तरुणीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडे खंडणीची मागणी केली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) ही मूळची भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी प्रणय संजय वाहाणे (२०, लाखनी, भंडारा) हा रियाच्या वर्गात शिकत होता. या दरम्यान दोघांची मैत्री झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दहावीनंतर ती आईवडिलांसह नागपुरात राहायला आली. तरीही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. बारावी झाल्यानंतर रिया एका फार्मा कंपनीत नोकरीला लागली. तर प्रणय हा बेरोजगार होता. दोघांच्या भेटी सुरू होत्या.

२०१६ पासून तर २०२२ पर्यंत दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. या दरम्यान प्रणय नागपुरात आला. त्याने धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये रियाला बोलावले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये छायाचित्र आणि चित्रफीत तयार केली. तिचे काही अश्लील फोटो काढले. बेरोजगार असलेला प्रणय वारंवार रियाला पैशाची मागणी करीत होता. प्रियकर असल्यामुळे ती पैसे देत होती.

हेही वाचा : संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेशक; नितीन गडकरी

रियाचे वेतन झाल्यानंतर प्रणय नागपुरात येऊन तिच्याकडून अर्धेअधिक वेतन लुबाडत होता. गेल्या काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेलेला प्रणय रियाकडे पैशाची मागणी करीत होता. परंतु, ती पैसे देण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने रियाचे काही अश्लील फोटो तिच्या मोबाईल पाठवले. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी तिने काही पैसे दिले. परंतु, तो वारंवार पैशाची मागणी करू लागला. त्यामुळे तिने धंतोली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रणयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रणयच्या मोबाईलमध्ये रियाचे अनेक फोटो आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader