नागपूर : शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नद्यांच्या सफाई अभियानाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. नदी आणि नाले सफाईच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा बैठक घेतली. पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने तिनही नद्यांच्या सफाई अभियानाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किलोमीटरप, पिवळी नदीची लांबी १७.४२ किलोमीटर आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किलोमीटर आहे. यंदा ७ फेब्रुवारीपासून नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात होत आहे.
सुरुवातीला नाग नदीच्या पात्राची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक आणि सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल या तीन टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे. या कामासाठी सात पोकलेन लावण्यात येणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली.
नाले सफाई सुरू
शहरातील १३ नाल्यांच्या सफाईचे काम सुरु आहे. सफाई झाल्यानंतर पुन्हा कचरा जमा होऊ नये यासाठी नियमितपणे सफाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरातील जुने आणि खोलभागात असलेल्या पुलांमध्ये पावसाळ्यात अडचण निर्माण होते. अशा पुलांचा शोध घेउन त्याची माहिती सादर करा. या पुलांच्या पुनर्निमाणाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. नदी आणि नाले सफाई करताना गाळ नदी पात्रात परत जाणार नाही याची काळजी घेण्याचेही निर्देश डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.