प्रशासनाची तारांबळ, नागरिकांकडून तक्रारी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर :  गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने मेयो रुग्णालयातील २५० सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. परिणामी अनेक वार्डामध्ये व रुग्णालय परिसरात दुपापर्यंत कचरा साचला होता.

मेयो रुग्णालयातील स्वच्छतेचे काम गेल्या तीन वर्षांपासून बीव्हीजी या खासगी कंपनीकडे आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना वेळेवर वेतन दिले जात होते. मात्र गेल्या वर्षभरापासून रुग्णालय प्रशासनाकडून कंपनीला ठरलेल्या करारानुसार पैसा दिला जात नसल्यामुळे कंपनीकडून गेल्या पाच महिन्यांचे वेतन सफाई कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर एक महिन्याचे वेतन दिले होते. मात्र करोनाच्या काळात ते दिवस रात्र काम करत असताना तीन महिन्यांपासून त्यांना वेतन न दिल्याने शुक्रवारी सकाळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. एरवी रुग्णालयातील सर्व वार्डात आणि परिसरात साफसफाई केली जाते. आज मात्र सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. यामुळे वार्डातील बेडसह इतरही अस्वच्छतेबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मेयो रुग्णालय प्रशासनासोबत बीव्हीजी कंपनीकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र मेयोच्या अधिष्ठात्यांकडून केवळ आश्वासन दिले जात होते. प्रत्यक्षात वेतन मिळत नव्हते. तीन महिन्यांपूर्वी एका महिन्याचे अध्रे वेतन दिले होते. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करून मेयो प्रशासनाला धक्का दिला. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत काम न क रण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिल्यामुळे मेयो रुग्णालय प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुपारनंतर मेयो प्रशासन व कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली मात्र त्यातून काहीच ठोस निर्णय न झाला नसल्याची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

गेल्या महिन्यात मेयो रुग्णालयाशी झालेला करार संपला होता. मात्र करोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाची अडचण होऊ नये म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कर्तव्य म्हणून काम केले. गेल्या तीन महिन्यापासून कंपनीला पैसे न दिल्याने आम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन करू शकलो नाही. यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना १६ हजार रुपयांपैकी अर्धे वेतन देऊ शकलो. मात्र आता कंपनीला शक्य नाही. प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. 

– सागर शिंदे, ऑपरेटर व्यवस्थापक, बीव्हीजी कंपनी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning workers in mayo hospital on strike zws