नागपूर : पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छता आवश्यक असून त्यासाठी समाजात वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र आमचे काही राजकीय नेते जगाला मार्गदर्शन करतात मात्र स्वत: काहीच करत नाही. असे आपण करु नका. आपले शहर म्हणून वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर रुग्णालयात जाण्याची गरज राहणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
शहरात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’अभियानाचा समारोप कस्तुरचंद पार्क येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेद्वारे शहरातील विविध वारसास्थळ परिसरात सफाई अभियान राबविण्यात आले. अनेक लोक आपल्याकडे चॉकलेट खात असतात आणि कागद मात्र रस्त्यावर फेकून देतात. विदेशात मात्र चॉकलेट खातात आणि त्याचा कागद स्वत:जवळ ठेवून तो कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतात. आपल्याकडे कुठेही लोक गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकतात. अशा थुंकणाऱ्या महान व्यक्तीचा फोटो काढून समाज माध्यमावर टाकला तर नागरिक पुन्हा तशी चूक करणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छता असणे आवश्यक आहे. समाजाप्रती कर्तव्य म्हणून वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच शहर स्वच्छ राहील आणि मनुष्याचे आरोग्य चांगले राहील, असेही गडकरी म्हणाले.
हे ही वाचा…“तीन नंबरची गाळ मुलगी शेतकऱ्यांच्या पोरांना…”; आमदार देवेंद्र भुयार महिलांविषयी जे बोलले त्यामुळे…
कुठलाही कचरा टाकाऊ नसतो, असे माझे मत आहे. कचऱ्याचा वापर, त्याचे रिसायकलिंग करून आपण अनेक कामांमध्ये वापरू शकतो. दिल्लीतील २० लाख टन कचरा आम्ही रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरला. कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेगळे काढता येते. त्याचा वापर रस्तेबांधणीत करता येतो. त्यामुळे टाकाऊ वस्तूंमधून अर्थाजन आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण ही महापालिकेची संकल्पना आदर्श ठरेल. कारण कचऱ्याचा योग्य वापर केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. टाकाऊ पदार्थांपासून नवनिर्मिती करताना आता टायर तसेच प्लॉस्टिकचा काही अंशी डांबरामध्ये समावेश करून अधिक दर्जेदार रस्ते तयार करण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला. कचऱ्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आता कचऱ्यातून इंधन निर्मितीच्या दिशेने काम सुरू असल्याचाही उहापोह त्यांनी केला. प्लास्टिकपासून टाईल्सची निर्मिती करून नागपूर महापालिकेने त्याचा वापर सुरू करावा तसेच गुटखा, पान खाऊन रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. स्वच्छता ही जीवनाची अविभाज्य गरज आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा करावी असे आवाहन गडकरी यांनी केले.