स्वच्छता दूत बेपत्ता -यंत्रणाही अपुरी

सार्वजनिक स्वच्छतेसाठी अनेक नियम तयार करणाऱ्या महापालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेली यंत्रणा (स्वच्छता दूत)अपुरी असल्याने हे सर्व नियम केवळ  कागदोपत्रीच राहिले आहे.

शहर स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नागपूर अव्वलस्थानी यावे म्हणून महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या. घरोघरी ओला व सुका कचऱ्याचे  विलगीककरण करण्यासाठी प्लास्टिकच्या कचराकुंडय़ा वाटप केल्या. रस्त्यावर किंवा सार्वजानिक ठिकाणी नागरिकांनी घाण करू नये म्हणून २३ प्रकारचेगवेगळे नियम तयार केले. त्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर दंड, घरासमोर कचरा टाकणे,  रस्त्याच्या कडेला कचरा जमा करून जाळणे, रस्त्याच्या कडेला किंवा कुठेही शौचाला किंवा लघुशंकेला बसण्यावर बंदी घालण्यात आली.  या नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छता दूतांची निवड केली. त्यांच्या मदतीला  ४० माजी सैनिकांची चमू देण्यात आली.  एका प्रभागात ५०ते ६० हजार लोकसंख्या आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी  केवळ दोन म्हणजे ३९ प्रभागात ८० स्वच्छता दूत नेमण्यात आले.

वरवर स्वच्छतेच्या पातळीवर दिसणारी महापालिकेची जागरूकता अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र शून्य आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा व घाण करणे सुरूच आहे. पान किंवा गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले नाही. मुळात हा प्रश्नच नियमांपेक्षा जनजागृती व नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करून सुटणारा आहे. नगरसेवक यात महत्त्वाची भूमिका बजाऊ शकतो. मात्र त्यांचे या कामाकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीसाठी महापालिकेकडे तक्रार करा असे सांगितले जाते. स्वच्छता दूत किंवा माजी सैनिकांची तुकडी कुठे फिरते. त्यांनी किती लोकांवर कारवाई केली याची वाच्यता सार्वजनिकरित्या महापालिका करीत नाही. स्वच्छता दूत केव्हा आणि कुठल्या भागात फिरतात याची महापालिकेकडे नोंद नाही.

दंड आकारणी सार्वजानिक ठिकाणी

थुंकणे – १०० रु.

लघुशंका करणे- १०० रु.

कचरा जाळणे- २०० रु.

भाजी-पाला फेकणे – २०० रु.

करचा टाकणे – २०० रु.

फुटपाथवर कचरा करणे-   ५०० रु.

दवाखाने, पॅथलॅबचा कचरा – १ हजार रु.

फुटपाथवर जनावरे बांधणे – ५०० रु.

जनावरे रस्त्यावर धुणे- ५०० रु.

घराच्या आजूबाजूला कचरा करणे – २०० रु.

बांधकाम साहित्य साठवणे –   ५ हजार रु.

स्वच्छता दुतांची संख्या

* लक्ष्मीनगर –  ८

* धरमपेठ –  ८

* हनुमानगर –  ८

* धंतोली –  ८

* नेहरूनगर  – ६

* गांधीबाग – १०

* सतरंजीपुरा –  ८

* लकडगंज – ८

* आशीनगर  – ८

स्वच्छतादूतांची संख्या कमी आहे. मात्र तरीही लक्ष ठेवणे सुरूच आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून सहा महिन्यात १ लाख ६० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वत:हून स्वच्छतेचे पालन करावे. लवकरच पालिकेच्या ५० पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून काम दिले जाणार आहे.

– दिलीप कांबळे, आरोग्य अधिकारी, स्वच्छता

Story img Loader