मध्य भारतातून पावसाचे जाण्याचे वेध लागलेले असतानाच आरोग्याच्या सर्वाधिक तक्रारीही याच काळात उद्भवतात. विशेषत: व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये स्वच्छतेअभावी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. गावांमधील हातपंपांच्या आजूबाजूला साठलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाऱ्या विविध रोगांना गावकरी बळी पडतात. गावकऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील ३ व्याघ्र प्रकल्पांसह मध्य भारतातील ६ व्याघ्र प्रकल्पांलगतच्या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात शाळांमधील विद्यार्थ्यांसह तरुण आणि गावकऱ्यांनीही सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत इसलँड बँकेच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला सहाही व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरित्या राबवण्याची जबाबदारी मध्यभारतात काम करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशनने उचलली.
फाऊंडेशनच्या चमूने व्याघ्र प्रकल्पांलगतच्या गावकऱ्यांना एकत्रित करून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. त्याला गावकऱ्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला.
पावसाळ्यात जागोजागी पाणी साचण्याचे प्रमाण मोठे असते. विशेषत: हातपंप आणि विहिरींलगतच्या खोलगट भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होतो. यासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले. त्यामुळे हे साचलेले पाणी आपोआप शोषून विहिरी आणि हातपंपांसभोवतालचा परिसर कोरडा झाला. त्याचवेळी या शोषखड्डय़ांमुळे सांडपाणीही विहिरी आणि हातपंपात जाण्यापासून कसे अडवले जाते, याचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना मिळाले आणि डासांच्या प्रादुर्भावापासून व होणाऱ्या रोगांपासून त्यांची सुटका झाली. स्वच्छतेच्या या उपक्रमासोबतच प्लास्टिकविरोधी मोहीम सहाही व्याघ्र प्रकल्पात राबवून ते पर्यावरणासाठी किती घातक आहे, याची माहिती गावकऱ्यांना देऊन त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. यावेळी गावकरी आणि विद्यार्थ्यांनी प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला.
ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा या महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसह मध्यप्रदेशातील कान्हा, सातपुडा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांलगतच्या सुमारे १२० हून अधिक गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर व्याघ्र प्रकल्पांलगतच्या गावातून कचरा गोळा करण्यात आला.
पर्यटक प्रामुख्याने त्यांचे खाद्य प्लास्टिकमध्ये आणतात आणि ते तसेच टाकून देत असल्याने अस्वल, बिबटे, रानकुत्रे यासारखे प्राणी त्याकडे आकर्षित होतात. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. इसलँड बँकेच्या सहकार्याने सातपुडा फाऊंडेशनने वनखात्याच्या मदतीने राबवलेली ही स्वच्छता मोहीम सहाही व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा