अनिल कांबळे
नागपूर : गृहमंत्रालयाने गेल्या ११ महिन्यांपासून पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्तपदावर पदोन्नती दिली नव्हती. त्या कारणामुळे राज्यातील सर्वच कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. मात्र, गृहमंत्रालयाने सोमवारी पदोन्नतीची यादी जाहीर केल्यामुळे राज्यभरातील सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नसल्यामुळे राज्यातील पोलीस खात्यातील अनेक निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीचा विषय गंभीर होता. बदल्या आणि पदोन्नतीबाबत गृहमंत्रालयातून वेळेवर निर्णय होत नसल्यामुळे राज्य पोलीस दलात अनेक दिवसांपासून नाराजीचा सूर होता. राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दर्जाचे जवळपास १७० अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यानंतरच सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या रिक्त जागांची आकडेवारी ठरणार होती. त्यामुळे पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीकडे संपूर्ण राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, गृहमंत्रालयातून सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यासाठी जवळपास एका वर्षांचा विलंब लागला. सध्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या १०२ तुकडीतील २२० आणि १०३ तुकडीतील जवळपास ४५८ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या १११ तुकडीतील ३५० आणि ११२ तुकडीतील ३३० अधिकाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे. सोमवारी २०१३ मधील ३८५ हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.
अधिकाऱ्यांचा मोकळा श्वास
पोलीस उपनिरीक्षकांच्या १११ तुकडीतील अर्ध्याअधिक जणांना पदोन्नती मिळाली आहे. तर त्याच तुकडीतील उर्वरित अधिकाऱ्यांना वर्गमित्रांनाच ‘सॅल्यूट’ मारावा लागतो. तसेच १०२ तुकडीतील सहायक निरीक्षकांनाही आपल्याच तुकडीतील मित्राच्या हाताखाली कनिष्ठ अधिकारी म्हणून काम करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून १०७ आणि १०८ तुकडीतील ८४ जण न्यायालयात गेल्याचे सांगून पदोन्नतीस विलंब केला जात होता. मात्र, ८४ जागा राखीव ठेवून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.